सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकार्यासह तिघांना अटक
घरकुल योजनेचा दुसरा हफ्ता देण्यासाठी मागितली होती लाच : एसीबीची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरकुल योजना मंजूर करताना त्या फाईलवर चौकशी केल्याचा मोबदला सेवानिवृत्तीनंतर घेताना सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
ग्रामविकास अधिकारी महादेव नामदेव सालगुडे (वय ४८, रा. तेज बिल्डिंग, भोलावडे, ता. भोर), सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दत्तात्रेय दादासाहेब खंडाळे (वय ५८, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, रुई, ता. बारामती) आणि खासगी व्यक्ती किसन रामचंद्र ठोसर (वय ५२, रा. शिंद, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे घरकुल मंजूर झाले होते. त्यांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी घरकुल योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला.
त्यानंतर तक्रारदारांनी घराचे बांधकाम सुरू करून फाउंडेशनपर्यंतचे काम पूर्ण केले. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी सालगुडे यांनी तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामाचे इंजिनिअरमार्फत फोटो काढून पंचायत समिती, भोर येथे अहवालासह सादर केले.
तक्रारदार १ एप्रिल २०२६ रोजी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत चौकशी करण्यासाठी पंचायत समितीत गेले असता, तेथील क्लार्ककडून त्यांना त्यांच्या गावचे ग्रामसेवक सालगुडे यांनी दुसरा हप्ता प्रलंबित ठेवण्यास सांगितल्याचे समजले.
त्यानंतर तक्रारदारांनी सालगुडे यांची भेट घेतली. सालगुडे यांनी घरकुलाचा दुसरा हप्ता खात्यात जमा करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी ६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी ९ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यात महादेव सालगुडे यांनी तक्रारदारांकडे घरकुलाचा दुसरा हप्ता खात्यात जमा करण्यासाठी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे व गोगरे यांच्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये, असे एकूण १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे आणि गोगरे हे कोण आहेत व त्यांचा तक्रारदाराच्या घरकुलाच्या प्रस्तावाशी काय संबंध आहे, याबाबत तक्रारदारांकडून माहिती घेतली असता, घरकुलाच्या प्रस्तावाची चौकशी त्यांच्याकडे देण्यात आली होती, अशी माहिती मिळाली.
त्यानंतर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे यांच्याकडे पडताळणी केली असता, त्यांनी तक्रारदारांना ग्रामविकास अधिकारी सालगुडे यांना ५ हजार रुपये लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार २२ एप्रिल रोजी ५ हजार रुपये घेऊन सालगुडे यांना भेटले. त्यावेळी सालगुडे यांनी तक्रारदारांकडे “१५ हजार रुपये आहेत का?” अशी विचारणा केली.
त्यावर तक्रारदारांनी ५ हजार रुपये आणल्याचे सांगितले. त्यावर सालगुडे यांनी “५ हजारांत काम होणार नाही, १५ हजार रुपये द्यावे लागतील,” असे सांगितले.
त्यानंतर तक्रारदारांकडे लाचेची मागणी केल्यानंतर १९ मे रोजी भोर-मोहोरडे रोडलगत किवत गावात सापळा रचण्यात आला. तक्रारदार १५ हजार रुपये घेऊन महादेव सालगुडे यांच्याकडे गेले असता, त्यांनी ती रक्कम किसन ठोसर याच्याकडे देण्यास सांगितले.
किसन ठोसर याने तक्रारदारांकडून १५ हजार रुपये स्वीकारताच दोन्ही आरोपींना किवत गावात दुपारी पकडण्यात आले. त्यानंतर खंडाळे यालाही ताब्यात घेण्यात आले.
भोर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ या तपास करत आहेत.
फेरफार नोंदीसाठी लाच घेताना तलाठ्याला अटक – वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीवर दोघा भावांच्या नावाची नोंद करण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपये घेतल्यानंतर आणखी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माण येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. संतोष प्रल्हाद राणे (वय ४५, रा. गंगा ओशन पार्क, राजस सोसायटीजवळ, कात्रज-कोंढवा रोड) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीवर तक्रारदार व त्यांच्या भावाचे नाव नोंद करण्यासाठी तलाठी राणे यांनी तक्रारदाराकडे सव्वा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १ लाख रुपये यापूर्वी स्वीकारले होते. फेरफार नोंद केल्यानंतरही तक्रारदारांकडे उर्वरित २५ हजार रुपयांची लाच मागितली जात होती.याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १४ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तलाठी संतोष राणे यांनी तक्रारदाराच्या कामासाठी यापूर्वी १ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.१९ मे रोजी माण तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी तक्रारदारांकडून २५ हजार रुपये स्वीकारताना राणे याला पकडण्यात आले. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून सहायक पोलीस आयुक्त भारती गोरे या तपास करीत आहेत.
