आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भोयरेतील ‘वैष्णवी अॅग्रो’ कारखान्यातून साडेदहा लाखांच्या सोलर केबल्स लंपास

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 20, 2026
Spread the love

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मौजे भोयरे येथील ‘वैष्णवी अॅग्रो प्रोडक्ट’ या कारखान्यात अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा सोलर प्लॅन्टला लक्ष्य करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी २०२४ मध्येही अशाच प्रकारची मोठी चोरी झाली होती. त्यामुळे सराईत टोळीने रेकी करूनच हा डाव साधल्याचा संशय व्यक्त होत आहे.

फिर्यादी अविनाश प्रदीप बागमार (वय ३८, रा. एकता कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मौजे भोयरे येथील गट क्र. ८८/३/२ मधील ‘वैष्णवी अॅग्रो प्रोडक्ट’ हा चिंचोक्याचा पावडर तयार करणारा कारखाना असून, तो गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे.

कारखान्याचे मालक प्रोप्रा. प्रदीप अमृतलाल बागमार असून, कारखान्याचा वीज खर्च कमी करण्यासाठी २०२२ मध्ये कारखान्याच्या आवारात ८०० केव्ही क्षमतेचा व सुमारे १५०० पॅनेल असलेला सोलर पॉवर प्लॅन्ट उभारण्यात आला होता.

दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी सोलर प्लॅन्टमधील मुख्य कॉपर केबल, सोलर पॅनल कनेक्टर, कम्युनिकेशन केबल तसेच लाईटनिंग अरेस्टरची केबल कटरच्या सहाय्याने कापून चोरी केली. या घटनेत एकूण १० लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

कारखान्याच्या सोलर प्लॅन्टसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले असतानाही चोरट्यांनी संधी साधून प्लॅन्टमधील वायरिंग तोडून साहित्य चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कारखान्याचे व्यवस्थापक पोपटराव दहीहंडे हे सोलर प्लॅन्टचे रिडिंग घेण्यासाठी गेले असता मीटर बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ प्लॅन्ट परिसराची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वायरिंग कापून चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी याबाबत फिर्यादी अविनाश बागमार यांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेतल्यानंतर चोरीची खात्री झाली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये टाटा कंपनीचे केबल कनेक्टर व वायर अंदाजे २ लाख २० हजार रुपये, सोलर प्लॅन्टची २५ हजार मीटर कॉपर केबल अंदाजे ८ लाख १२ हजार ५०० रुपये, पॉलिकॅब कंपनीची ४०० मीटर कम्युनिकेशन केबल अंदाजे ३० हजार रुपये तसेच लाईटनिंग अरेस्टर केबल अंदाजे ७ हजार रुपये असा एकूण १० लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे करीत असून, नुकतीच त्यांची एपीआय पदावर पदोन्नती झाल्याने तपास अधिक वेगाने आणि तांत्रिक पद्धतीने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

२०२४ मध्येही झाला होता ८ लाखांचा फटका
विशेष बाब म्हणजे मार्च २०२४ मध्येही याच सोलर प्लॅन्टमधून अंदाजे ८ लाख रुपयांच्या कॉपर केबल आणि सोलर कनेक्टरची चोरी झाली होती. त्या वेळी अंदाजे २० हजार मीटर कॉपर केबल वायर आणि २४०० केबल कनेक्टर चोरीस गेले होते.आता २०२६ मध्ये पुन्हा १० लाख ६९ हजार ५०० रुपयांची चोरी झाल्याने गेल्या दोन घटनांमध्ये मिळून कारखान्याला तब्बल १८ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

औद्योगिक भागातील सोलर प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सलग घडणाऱ्या या घटनांमुळे बार्शी औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून सोलर प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निर्जन भागातील सोलर प्रकल्पांवर चोरट्यांची नजर असल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांनी विशेष गस्त वाढवून या टोळीचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी उद्योजक व नागरिकांकडून होत आहे.