सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतुसे जप्त
डेक्कन पोलिसांची कामगिरी : गुंडावर खंडणीसह ५ गंभीर गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून नदीपात्रात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला डेक्कन पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ (वय ३५, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरळ याच्याविरुद्ध यापूर्वी डेक्कन, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यांत खंडणीसह गंभीर स्वरूपाचे ५ गुन्हे दाखल आहेत.
डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस हवालदार सचिन गायकवाड आणि सागर घाडगे हे डेक्कन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना माहिती मिळाली की, नदीपात्रात गुंड मरळ थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मरळ याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक सपना देवताळे, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, संजय दंडगुळे आणि धनश्री सुपेकर यांनी केली.
