ऑनलाईन गेमिंगमध्ये फसवणूक करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त
हडपसर, फुरसुंगीमधील ५ ठिकाणी कारवाई : दररोज शेकडोंची होत होती फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर व फुरसुंगी येथे बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवर मुंढवा पोलिसांनी हडपसर व सायबर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कॉल सेंटर उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहून बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवून लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यास प्रवृत्त करून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली जात होती. एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोन प्रमुख सूत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मध्यरात्री प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७, रा. पार्क इन्फिनिया सोसायटी, भेकराईनगर, मूळ रा. वेजणे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के (वय ४०, रा. सिल्व्हर वुड सोसायटी, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या प्रमुख साथीदारांपैकी अमित मजेटिया हा दुबई येथे असून भागिरथ पांड्या हा त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.
निदा आरीफ अन्सारी (वय २१, रा. अपोलो हॉस्पिटलजवळ, गोपाळपट्टी, मांजरी), पुनम अनंत भालके (वय २५, रा. लेन नं. १३, भेकराईनगर, तुकाई दर्शन, हडपसर), अनुजा शरद जाधव (वय २५, रा. गायकवाड हॉस्पिटलजवळ, केशवनगर, मुंढवा), रविंद्र कृष्णा कुरळे (वय ४०, रा. सर्व्हे नं. २०९, भागीरथी नगर, साधूनाना तुपे वस्ती, हडपसर), अक्षय झिबू पाटील (वय २५, रा. थिटेवस्ती), विवेक विलास जाधव (वय ३०, रा. अर्जुन कॉम्प्लेक्स, फुरसुंगी रोड, भेकराईनगर, हडपसर), प्रांजल अनिल मिश्रा (वय २३, रा. औदुंबर कॉलनी, काळेपडळ) आणि सागर कैलास उसरे (वय ३०, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण कॉल सेंटरमध्ये काम करत होते.
ही कारवाई अमनोरा चेंबर्स, अमनोरा मॉल, भेकराईनगर येथील अॅपेक्स अॅचीव्हर आणि जेकेएल इंडिया सोल्युशन या ठिकाणांसह एकूण पाच ठिकाणी करण्यात आली. मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनोरा चेंबर्स येथे बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालविले जात असल्याची माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली होती. तेथून लोकांना ऑनलाईन गेमिंग खेळण्यास प्रवृत्त करून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली जात होती.
या ऑनलाईन गेमिंगमध्ये फसलेल्या काही तरुणांकडूनही पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी सायबर व हडपसर पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी छापे टाकले.
या कॉल सेंटरमध्ये संतोष वेंजणेकर याने तरुणांना कामावर ठेवून त्यांच्याकडून पॅन कार्ड व आधार कार्ड घेऊन त्यामध्ये फेरफार करून सिम कार्ड घेतली होती. तसेच बनावट बँक खाती उघडून त्यांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला जात होता.
याशिवाय, त्याने या कॉल सेंटरमध्ये पाच अल्पवयीन मुला-मुलींना कामावर ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे जबरदस्तीने करून घेत त्यांचे शोषण केले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या कॉल सेंटरमधून नागरिकांना कॉल करून कंपनीच्या वेबसाईटद्वारे गेमिंग खेळण्यास सांगितले जात असे. सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केला जात असे. त्यानंतर त्यांना ऑनलाईन गेमिंगसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जात होते. सुरुवातीला काही गेममध्ये नागरिक जिंकत असत. मात्र, पुढे ते सतत गेम हरत जात. त्यानंतर “तुमचे पैसे परत मिळू शकतात” असे सांगून त्यांच्याकडून आणखी पैसे ट्रान्सफर करून घेतले जात होते.
या पाच ठिकाणांहून हार्ड डिस्क, एसएसडी, ऑटो डायलर मशीन, सिम कार्ड, सर्व्हर रूममधील हार्ड डिस्क, कागदपत्रांच्या फाईल्स, कंपनीच्या नावाचे शिक्के, विविध बँक खात्यांची चेकबुक, पासबुक, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप, सीसीटीव्ही डीव्हीआर, ग्राहक संभाषण स्क्रिप्ट, सिम बॉक्स, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, विविध बँकांची डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल फोन तसेच एक पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई जवळपास १७ तास सुरू होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. उर्वरित १० कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले दोघेही अनेक तास पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक होते. त्यामुळे मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे पुढील तपास करीत आहेत.
साडेचार महिन्यांपासून सुरू होते कॉल सेंटर
या कॉल सेंटरमधून दररोज ३०० ते ४०० जणांची सुमारे ३० ते ४० लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. हे कॉल सेंटर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. यातील प्रमुख सूत्रधार संतोष वेंजणेकर आणि विनायक इक्के आहेत. अमित मजेटिया हा दुबईमध्ये असून तो या सर्वांना मदत करत होता. तर भागिरथ पांड्या हा सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होता. आलेले पैसे कुठे आणि कसे ट्रान्सफर करायचे, हे काम तो पाहत होता. या दोघांचा शोध सुरू आहे.
बेकायदा पिस्तूल जप्त
या ठिकाणी पोलीस छापा कारवाई करत असताना संतोष वेंजणेकर याच्याकडे पिस्टल व ६ जिवंत काडतुसे सापडली आहे.
