आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

21 वर्षांत 25 बदल्या, IAS तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 20, 2026
Spread the love

मुंबई : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढेयांची अवघ्या 45 दिवसांत पुन्हा बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांची अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी नियुक्ती केली असून, त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही तब्बल 25 वी बदली ठरली आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे प्रशासकीय स्थैर्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

2005 बॅचचे IAS अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे कडक शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि धडाकेबाज निर्णयशैलीमुळे राज्यभर प्रसिद्ध आहेत. “महाराष्ट्राचे सिंघम” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

त्यांनी आतापर्यंत नाशिक महापालिका आयुक्त, नागपूर महापालिका आयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालक, सोलापूर जिल्हाधिकारी, जालना जिल्हाधिकारी, आरोग्य सेवा आयुक्त, परिवहन विभाग तसेच विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

विशेष म्हणजे, मार्च 2026 मध्येच त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीतील 24 वी बदली झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र अवघ्या दीड महिन्यात पुन्हा नव्या विभागात बदली झाल्याने प्रशासनातील वारंवार होणाऱ्या बदल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

तुकाराम मुंढे यांनी ज्या-ज्या विभागात काम केले, तेथे त्यांनी शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले. नागपूर महापालिकेत बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करणे, गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई, भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका, अनधिकृत कामांवर धडक मोहीम यांसारख्या निर्णयांमुळे ते कायम चर्चेत राहिले.

आरोग्य विभागातही त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा राबविल्या होत्या. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभाग हा राज्यातील अन्न सुरक्षा, औषध नियंत्रण, बनावट औषधांवर कारवाई आणि ग्राहक संरक्षणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो.

त्यामुळे मुंढे यांच्या नियुक्तीकडे आता विशेष लक्ष लागले आहे. त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे या विभागातही मोठ्या प्रमाणात बदल आणि कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील वारंवार होणाऱ्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांत 25 बदल्या झाल्याने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.