आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट सोने तारण ठेवून स्टेट बँकेची सव्वा चार कोटींची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 20, 2026
Spread the love

पुणे : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम पाहत असताना दोन भावांनी १३ कर्जदारांशी संगनमत करून बनावट सोने तारण ठेवत स्टेट बँकेची तब्बल ४ कोटी २३ लाख ४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मनोजकुमार (वय ४३, रा. सिंहगड रोड) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोक्ष हिम्मतमल जैन आणि चिराग हिम्मतमल जैन (रा. शिवस्मृती सोसायटी, शनिवार पेठ) यांच्यासह १३ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २६ मे २०२५ पासून आतापर्यंत घडल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोजकुमार हे स्टेट बँकेच्या हिंगणे शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शाखेत हिम्मतमल जैन हे अनेक वर्षे गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम करत होते. वर्षभरापूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या दोन मुलांची, मोक्ष आणि चिराग जैन यांची सोने तारण कर्ज प्रकरणांसाठी व्हॅल्युअर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

या दोघांनी १३ कर्जदारांनी तारण ठेवलेले बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यावर विश्वास ठेवून बँकेने १३ अर्जदारांच्या २८ कर्ज प्रकरणांमधून एकूण ४ कोटी ४४ लाख ४७ हजार ९०० रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. मात्र, तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर बँकेने दोघांना नोटीस बजावली. त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता ते शनिवार पेठेतील पत्त्यावर राहत नसल्याचे समोर आले. अखेर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ करीत आहेत.

अंतर्गत ऑडिटमध्ये उघड झाला प्रकार
बँकेचे अंतर्गत ऑडिट २९ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये दुसऱ्या व्हॅल्युअरांकडून तपासण्यात आलेल्या ८ सोनेतारण प्रकरणांमध्ये सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बँकेने तारण ठेवण्यात आलेल्या सर्व १७६ प्रकरणांतील सोन्याचे पुनर्मूल्यांकन केले. त्यामध्ये मोक्ष आणि चिराग जैन यांनी प्रमाणित केलेल्या २८ कर्ज प्रकरणांतील सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले.बँकेने दोघांना चौकशीसाठी बोलावले असता चिराग जैन हजर झाला होता. त्याने “एकूण किती रक्कम बाकी आहे ते सांगा, आम्ही ती बँकेत जमा करतो,” असे सांगितले. त्यानुसार बँकेने ४ कोटी ४४ लाख रुपये आणि त्यावरील व्याज इतकी रक्कम थकबाकी असल्याचे कळविले. त्यानंतर चिराग जैन याने नरेंद्रसिंग यांच्या दोन कर्ज खात्यांमध्ये एकूण ३२ लाख ६० हजार रुपये भरून ती खाती बंद केली. मात्र, त्यानंतर त्यांनी कोणतीही रक्कम जमा केली नाही. तपासात असेही समोर आले आहे की, मोक्ष जैन याने १३ कर्जदारांना बनावट सोने तारण ठेवण्यास प्रवृत्त करून त्यांच्या नावावर २८ कर्ज प्रकरणे मंजूर करून घेतली होती. त्या कर्जाची रक्कम त्याने स्वतः घेतली होती. “कर्जाची परतफेड मी करतो,” असे आश्वासन त्याने कर्जदारांना दिले होते. दरम्यान, दोन्ही भाऊ सध्या फरार असून त्यांच्या घरात आता भाडेकरू राहत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.