बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई
७५० लिटर हातभट्टी दारूसह ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त : एक आरोपी ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बावी ते बार्शी रोडवर बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बार्शी तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७५० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. या कारवाईत दारू, टेम्पो व इतर मुद्देमालासह एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अविनाश प्रकाश पवार (वय २७, रा. तांबेवाडी यमाई तांडा, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, बावी ते बार्शी रोडवरून एका अशोक लेलँड टेम्पोमधून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक होत आहे.
या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फपाळवाडी शिवारातील हॉटेल रॉयल कॉटेज परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित राखाडी रंगाचा अशोक लेलँड टेम्पो (क्र. MH 13 DQ 4813) पोलिसांच्या नजरेस पडताच तो अडवण्यात आला. चालकाने सुरुवातीला वाहनात शेतीमाल असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता पाठीमागील हौद्यात काळ्या रंगाच्या रबरी ट्युब आढळून आल्या. त्यातून गावठी हातभट्टी दारूचा तीव्र वास येत असल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष सखोल तपासणी केली.
तपासणीत १५ रबरी ट्युबमध्ये प्रत्येकी ५० लिटरप्रमाणे एकूण ७५० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे ७५ हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड टेम्पो अंदाजे ३ लाख रुपये किमतीचा आहे.
असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळी दारूचे नमुने घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये बेकायदेशीर दारू बाळगणे व वाहतूक करणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोतीराम बोंदर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अतिरिक्त बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे, धनराज केकान, सोमनाथ खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर, रोहित बागल व पथकाने पार पाडली.
