सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून तरुणाचा निर्घृण खून
मांजरी खुर्द येथील घटना : दोरीने बांधले होते दोन्ही पाय, तरुणाची अद्याप पटली नाही ओळख
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणाचे दोन्ही पाय दोरीने बांधून त्याच्या डोक्यात सिपोरेक्स सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांजरी खुर्द येथील व्हीटीपी आणि गेरा कन्स्ट्रक्शन या दोन्ही साईटच्या मधोमध नदीकिनारी हा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
याबाबत पोलीस अंमलदार दीपक बाळू कोकरे (वय ३०) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता उघडकीस आला आहे.
व्हीटीपी आणि गेरा कन्स्ट्रक्शन या दोन साईटच्या मध्ये झाडीझुडपे असून, त्यामध्ये एकाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. हा मृतदेह ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणाचा आहे. त्याचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते. त्याच्या डोक्यात सिपोरेक्स ब्लॉकने मारून त्याचा खून करण्यात आला आहे.
या तरुणाच्या अंगात फिकट गुलाबी रंगाचा फुल शर्ट असून, त्यावर इंग्रजीमध्ये ‘यश डिझायनर शर्ट’ असे लिहिलेले आहे. त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले असून, त्यावर निकीचा लोगो आहे.
निळ्या रंगाच्या पॅन्टवर ‘बाय युग यूथ’ असे इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे. त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा बेल्ट असून, पायात विटकरी रंगाची चप्पल होती. तसेच, त्याच्याजवळ आकाशी रंगाचे वायरलेस हेडफोन आढळले.
वाघोली पोलिसांनी परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कोणी बेपत्ता आहे का, याची चौकशी केली. या तरुणाच्या हरवल्याची कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंद नाही.
मारेकऱ्यांना त्याचा खून करून मृतदेह नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट करायचा होता. परंतु, नदीपात्रात मृतदेह टाकणे शक्य न झाल्याने त्यांनी नदीकिनाऱ्यावरील झुडपांमध्ये हा मृतदेह टाकून दिल्याचे दिसून येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सहदेव हवाले तपास करीत आहेत.
