आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीच्या लिओची लायन्स इंटरनॅशनल स्तरावर दखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 20, 2026
Spread the love

बार्शी : Lions Clubs International अंतर्गत कार्यरत असलेल्या लिओ क्लब ऑफ बार्शी टाउन चे चार्टर प्रेसिडेंट तसेच महाराष्ट्राचे विद्यमान लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ शुभम संजय श्रीश्रीमाळ उर्फ पवन यांना लायन्स इंटरनॅशनल तर्फे लिओ चळवळीतील अत्यंत प्रतिष्ठेचा “Leo of the Year Award 2025-26” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

“Leo of the Year Award” हा पुरस्कार जगभरातील लिओ सदस्यांसाठी सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या सन्मानांपैकी एक मानला जातो. उत्कृष्ट नेतृत्व, समाजसेवेतील सातत्यपूर्ण योगदान, संघटन कौशल्य, युवकांमध्ये नेतृत्व विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच लिओ चळवळीच्या विस्तारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अत्यंत मर्यादित लिओ सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.

भारतातूनही मोजक्याच लिओंना हा बहुमान प्राप्त होतो. विशेष अभिमानाची बाब म्हणजे डिस्ट्रिक्ट 3234 D1 अंतर्गत (सोलापूर,सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग) या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लायन्स डिस्ट्रिक्टच्या इतिहासात प्रथमच हा प्रतिष्ठेचा “Leo of the Year Award” प्रदान करण्यात आला असून, हा सन्मान प्राप्त करणारे लिओ पवन संजय श्रीश्रीमाळ हे पहिले लिओ ठरले आहेत.

त्यामुळे बार्शीसह संपूर्ण जिल्हा तसेच महाराष्ट्रातील लायन्स व लिओ परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा पुरस्कार दरवर्षी Lions Clubs International चे इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांच्या वतीने प्रदान करण्यात येतो.

यावर्षीचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट ए. पी. सिंग यांच्या वतीने हा पुरस्कार लिओ क्लब बार्शी टाउन चे ॲडव्हायझर ला.प्रकाश फुरडे यांचा कडे पाठविण्यात आला होता.

दि. १६ व १७ मे २०२६ रोजी Pune येथील कोथरूड, कर्वे रोडवरील हर्षल बँक्वेट्स अँड कन्व्हेन्शन्स येथे आयोजित “विजयोत्सव” Multiple Convention MD 3234 अंतर्गत झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात लिओ पवन श्रीश्रीमाळ यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील लायन्स व लिओ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर इंटरनॅशनल लायन्सचे पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर प्रवीण छाजेड, ला नरेंद्र भंडारी, गुजरात राज्यातील लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला.शिल्पा छाजेड, मुंबई विभागाचे लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला.फिरोज कटराक, इंटरनॅशनल डायरेक्टर इंडोरसी ला.राजेंद्र मुच्छाल, मल्टिपल चे कौन्सिल चेअरमन ला. विजय सारडा, एम. के. पाटील, गिरीश सिसोदिया तसेच फास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन ला. गिरीश मालपाणी यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील Past District Governors, विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी व लिओ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लिओ पवन श्रीश्रीमाळ यांनी आपल्या कार्यकाळात युवकांना समाजसेवेसाठी प्रेरित करत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रक्तदान, नेतृत्व विकास, युवा सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली Leo Multiple District 3234 अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पार पडले असून, त्याचीच दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

हा सन्मान केवळ लिओ पवन श्रीश्रीमाळ यांच्यासाठी नसून महाराष्ट्रातील लायन्स आणि लिओ परिवारासाठी अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.