व्यवसायवाढीसाठी मित्राला मदत करणे पडले महागात
तीन महिन्यांच्या बोलीवर घेतले ३५ लाख : व्यापार्याने केली फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एकाच सोसायटीत राहत असल्याने त्यांची ओळख होती. त्यातून ते मित्र बनले. व्यवसायवाढीसाठी त्यांनी मित्राला तीन महिन्यांच्या मुदतीवर ३५ लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर मात्र मित्राची नियत फिरली. त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एका व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संजय धनराज कटारिया (वय ६४, रा. कुमार सिद्धाचल, बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नितीन सुगनलाल सेठीया (वय ६१, रा. ऋतुराज सोसायटी, प्रेमनगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय कटारिया यांची आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे स्वतःची ८ एकर बागायती शेती आहे. शेती व्यतिरिक्त त्यांचा रिअल इस्टेट व्यवसायही आहे. नितीन सुगनलाल सेठीया यांचा बांधकाम व्यवसाय आहे. दोघे एकाच कॉलनीत राहत असल्याने त्यांची मैत्री झाली होती.
सेठीया यांना बांधकामासाठी तसेच व्यवसायवाढीसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी संजय कटारिया यांच्याकडे पैशांची मागणी केली. २०२५ मध्ये कटारिया यांनी तीन चेकद्वारे सेठीया यांना ३५ लाख रुपये दिले. हे पैसे तीन महिन्यांनंतर परत देण्याचे आश्वासन सेठीया यांनी दिले होते. कटारिया हे सेठीया यांना चांगले ओळखत असल्याने त्यांनी विश्वासाने पैसे दिले होते.
तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर कटारिया यांनी वारंवार फोनद्वारे संपर्क करून पैशांची मागणी केली. मात्र, प्रत्येक वेळी सेठीया यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तीन महिन्यांच्या बोलीवर पैसे घेतले असताना त्यानंतर अनेक महिने उलटूनही सेठीया यांनी अद्याप पैसे परत केले नाहीत. अखेर कटारिया यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
