आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अक्षय मस्केंवर गोळीबार करणाऱ्या ५ जणांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 21, 2026
Spread the love

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपीच्या भावावर गोळीबार करून कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

अक्षय ऊर्फ बाळू बापू मस्के (वय २६) याच्यावर बुधवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर पुणे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या विविध पथकांसह सहकारनगर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

या प्रकरणी आफ्ताफ शरीफ सय्यद (रा. भाग्यदेवनगर, कोंढवा खुर्द), ऋषीप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. चुडामण तालीमजवळ, नाना पेठ), आवेज अशपाक शेख (वय २६, रा. गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, रा. पालखी विठोबा चौक, भवानी पेठ) आणि अमन फारूक बागवाले (वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना तपासादरम्यान काही आरोपींची नावे समजली. त्यानंतर ऋषी आंबट याच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपी आदल्या दिवशी कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते आणि घटनेनंतर पुन्हा तेथे गेले असावेत, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट-१चे पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या पथकाने कार्ला येथे जाऊन एकविरा देवीच्या डोंगर परिसरात शोधमोहीम राबवली. त्यावेळी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी अक्षय मस्के यांची पत्नी करुणा अक्षय मस्के (वय २२, रा. स्वामी समर्थनगर, आंबेगाव पठार) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी गँगस्टर बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, तुषार निरंजन वाडेकर, स्वराज निरंजन वाडेकर, स्वप्नील बहादुरकर यांच्यासह एकूण १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वनराज आंदेकर यांच्या खुनासाठी पिस्तूल पुरवल्याच्या आरोपाखाली आकाश मस्के याला यापूर्वी अटक करण्यात आली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्याचा भाऊ अक्षय मस्के हा रिक्षाचालक असून, वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर व साथीदारांनी संगनमताने कट रचल्याचा आरोप आहे.

बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अक्षय मस्के हा रिक्षा घेऊन बालाजीनगर येथील राजर्षी शाहू बँक चौकात थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळीबार केला.

त्यानंतर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. जखमी अक्षय मस्के याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.