आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अंमली पदार्थांवर मोठा प्रहार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 21, 2026
Spread the love

सोलापूर : राज्यातील अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळवत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४ कोटी २८ लाख २७ हजार ६३५ रुपयांचा गांजा व अफूचा मुद्देमाल जाळून नष्ट केला. सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोतील एस.एस. सर्व्हिसेसच्या Incinerator मध्ये ही कारवाई करण्यात आली.

भारत सरकार व पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमली पदार्थांच्या मुद्देमालाची निर्गती करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष अंमली पदार्थ नाश समिती स्थापन केली होती. समितीने जिल्ह्यातील मागील काही वर्षांतील अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचा आढावा घेत संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकरणांतील मुद्देमाल नाशासाठी मंजूर केला.

या कारवाईत एकूण १७ पोलीस ठाण्यांमधील २९ गुन्ह्यांतील १६९७ किलो ४२९ ग्रॅम गांजा, तसेच १९ किलो ६१८ ग्रॅम अफू व अफूची झाडे असा एकूण ४,२८,२७,६३५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यामध्ये गांज्याची किंमत ४,२४,३५,२७५ रुपये तर अफूची किंमत ३,९२,३६० रुपये इतकी होती.

दि. १५ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. यामध्ये पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) शिरीष हुंबे, पोनि संजय जगताप (स्थागुशा), वजन मापन निरीक्षक सुधीर खांडेकर, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अभिजीत लोहीया, सहाय्यक रासायनिक विश्लेषक डॉ. गु.रा. देशमुख व वैज्ञानिक सहायक राहुल पाटील (सी.ए. पुणे) सहभागी झाले होते.

या मोहिमेत सोलापूर तालुका, मोहोळ, कामती, मंद्रूप, वळसंग, अक्कलकोट दक्षिण, बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग, कुडुवाडी, करमाळा, पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण, करकंब, मंगळवेढा आणि अकलूज या पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा समावेश होता.

मुद्देमाल नाशापूर्वी शासकीय पंच रोहन उद्धव लोंढे व विकास थोरात, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक यांच्या उपस्थितीत मुद्देमालाची पुन्हा वजन तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या पथकाने नमुन्यांची तपासणी करून सदर पदार्थ गांजा व अफू असल्याचा अंतिम अहवाल दिला.

यानंतर समितीच्या उपस्थितीत भोगाव येथील Incinerator मध्ये सर्व मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व पोलीस ( मुख्यालय) हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोउपनि प्रभाकर ताटे-देशमुख, सहायक फौजदार निलकंठ जाधवर, कमल बुरकुल, पोहेकॉ आबासाहेब मुंढे, हरीदास पांढरे, अनिस शेख, गणेश बांगर, अश्विनी गोटे, दिपाली जाधव, पोकॉ अशोक हलसगी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांतील मुद्देमाल कारकून यांनी सहभाग घेतला.