प्रकल्प विकसनासाठी गुंतवणूक घेऊन पावणे पाच कोटींचा गंडा
परदेशी गुंतवणूकदारासह ८ जणांची फसवणूक : रवीनंदा लँडमार्कच्या संचालकांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रकल्प विकसित करण्यासाठी गुंतवणूक स्वीकारून प्रकल्प पूर्ण होत असताना बाय-बॅक स्कीममध्ये फ्लॅट खरेदी करून देतो, असे सांगून परदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्या फ्लॅटची परस्पर विक्री करून ४ कोटी ७३ लाख २३ हजार ५५४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी रवीनंदा लँडमार्कच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मन्सूर कुतुबद्दीन पोलन (वय ६१, रा. सिंड्रेला अपार्टमेंट, साचापीर स्ट्रीट, कॅम्प) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रवीनंदा लँडमार्कचे भागीदार समीर रविंद्रलाल जैन आणि देवेश रविंद्रलाल जैन (रा. मार्केटयार्ड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २८ डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मन्सूर पोलन यांची मारिया रिअल इस्टेट ही फर्म आहे. रवीनंदा लँडमार्क ही समीर जैन व देवेश जैन यांची भागीदारी फर्म आहे. त्यांचे मार्केटयार्ड येथे मुख्य कार्यालय आहे.
त्यांचे पुणे शहरात वाघोली, कोंढवा, लुल्लानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ६ प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये वाघोली येथील केसनंद फाटा येथे रवीनंदा स्कायलाइट्स हा प्रकल्प सुरू आहे. येथे एक व दोन बेडरूमचे फ्लॅट आहेत. या प्रकल्पात १२ मजली इमारती आहेत.
प्रकल्प विकसित करण्याच्या वेळी जैन बंधूंनी परदेशी गुंतवणूकदारांना त्यामध्ये काही युनिट देतो, असे सांगून त्यांच्याकडून गुंतवणूक स्वीकारली. समीर जैन व देवेश जैन यांनी फिर्यादी मन्सूर पोलन व इतरांना फ्लॅट खरेदीवर बाय-बॅक स्कीममध्ये फ्लॅट खरेदी करून देतो, असे सांगितले. त्यानुसार २८ डिसेंबर २०१५ रोजी त्यांनी त्यांच्याकडून ४ कोटी ७३ लाख २३ हजार ५५४ रुपये घेतले.
त्यांचा हा प्रकल्प २०१८ पासून टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहे. असे असताना गुंतवणूकदारांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे फ्लॅट दिले नाहीत, तसेच त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा परतावाही दिला नाही. त्यांना सांगितलेले फ्लॅट परस्पर दुसऱ्यांना विक्री केले. त्यांनी पैसे परत मागितल्यानंतरही पैसे परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली.
त्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्या तक्रार अर्जाची तपासणी केल्यानंतर वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक श्वेता बेल्हेकर तपास करीत आहेत.
