ज्येष्ठांच्या देखभालीसाठी केअर टेकर ठेवताय!
केअर टेकरने २३ लाखांचे दागिने चोरले : सांगलीहून केअर टेकरला केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरातील तरुण-तरुणी दोघेही कामाला जात असताना ज्येष्ठांची काळजी घेण्याची मोठी समस्या शहरांमध्ये दिसून येते. त्यासाठी अनेक जण केअर टेकर ठेवतात. मात्र, या केअर टेकरची नजर घरातील दागिन्यांवर पडते आणि त्यातून ते चोरी करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आईची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअर टेकरने घरातील २२ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. विश्रांतवाडी पोलिसांनी या केअर टेकरला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथून जेरबंद केले आहे.
स्नेहल सुभाष साळुंखे (वय २८, रा. पुणे स्टेशन, मूळ रा. वाटेगाव, जि. सांगली) असे या केअर टेकरचे नाव आहे.
याबाबत अमोल विजय तेंडुलकर (वय ४२, रा. हरिगंगा सोसायटी, फुलेनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२५ ते १६ मे २०२६ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपल्या आईची देखभाल करण्यासाठी स्नेहल साळुंखे याला केअर टेकर म्हणून नेमले होते. गेल्या ६ महिन्यांपासून तो त्यांच्याकडे काम करत होता. या दरम्यान त्याने घरात आईव्यतिरिक्त कोणी नसताना त्यांची नजर चुकवून घरातील एक-एक सोन्याचे दागिने चोरून नेण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांनी १६ मे २०२६ रोजी त्यांच्या आईच्या कपाटात पाहिले असता दागिने दिसून आले नाहीत. त्यांनी घरात शोध घेतल्यावर २२ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी स्नेहल साळुंखे याला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तो कामावर आला नाही. त्यामुळे हे कृत्य स्नेहल साळुंखे यानेच केल्याची शंका आली.
अमोल तेंडुलकर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यावर तो गावी पळून गेल्याचा संशय आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गावाकडे जाऊन त्याला पकडले. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
अशी घ्या खबरदारी
केअर टेकर हवा असल्यास तो विश्वासार्ह संस्थेमार्फतच ठेवावा.
केअर टेकरची संपूर्ण माहिती, आधार कार्ड व फोटोची प्रत आपल्याजवळ ठेवावी.
घरात दागिने उघड्या कपाटात न ठेवता लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत.
ज्येष्ठांचे दागिने सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य द्यावे.
घरातील दागिने व मौल्यवान वस्तू नियमितपणे तपासून पाहाव्यात.
