राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने चार सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षक भवन, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील चार सामाजिक कार्यकर्त्यांना “राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सामाजिक, आरोग्य, रक्तदान आणि निराधारांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
भिगवण येथील सचिन बोगावत यांना कोरोना काळात प्लाझ्मा, मास्क, सॅनिटायझर तसेच गरजूंना आपत्कालीन मदत उपलब्ध करून देणे, शाळांना डिजिटल क्लासरूम, पूरग्रस्तांना मदत, वृक्षारोपण आणि वैद्यकीय सहाय्य यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी गौरविण्यात आले.
राहू (ता. दौंड) येथील हर्षल भटेवरा यांना कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा, रक्तपिशव्या, बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप, रक्तदान शिबिरे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यांसारख्या कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड येथील विरेश छाजेड यांना “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान क्षेत्रातील योगदान तसेच डोळे, दंत आणि कॅन्सर तपासणीसारखे आरोग्य उपक्रम राबवल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
इंदापूर येथील धरमचंद लोढा यांना निराधार व बेवारस व्यक्तींना आधार देणे, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे, वारकऱ्यांची सेवा, वृक्षारोपण आणि रक्तदान यांसारख्या मानवतावादी कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला.
या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शेखर जगन्नाथ तुपे सामाजिक विकास संस्था, राष्ट्रबांधव अकॅडेमी, राष्ट्रभक्ती परिवार आणि प्रहार युथ ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
