आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सिद्धी फाउंडेशनचा १८ वा रक्तदान महायज्ञ

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 22, 2026
Spread the love

पुणे : समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा सिद्धी फाउंडेशनचा १८ वा रक्तदान उपक्रम गुरुवार, २१ मे रोजी महावीर प्रतिष्ठान, डी जॅकपुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडला. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल २०२६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले.

गेल्या अठरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम आज पुण्यातील एक विश्वासार्ह आणि व्यापक आरोग्यसेवा चळवळ म्हणून ओळखला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक संस्था, युवक, महिला, व्यावसायिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या कार्यात सहभाग घेतला.

या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सिद्धी ग्रुपचे मनोज छाजेड, ललित शिंगवी, मुकेश छाजेड, जिनूभाई लोढा यांच्यासह समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले. संपूर्ण शिबिरात स्वयंसेवकांची धावपळ, रक्तदात्यांचा उत्साह आणि सामाजिक एकात्मतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन यंदाच्या शिबिरात रक्तदात्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. शिबिरस्थळी पुरेशी सावली, नाश्ता व जेवणाची व्यवस्था, प्राथमिक वैद्यकीय तपासणी तसेच विश्रांतीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रक्तदान प्रक्रियेदरम्यान कोणालाही त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथक सतत कार्यरत होते.

या उपक्रमामुळे पुणे शहरासह परिसरातील विविध रुग्णालयांना वेळेवर रक्तपुरवठा उपलब्ध होणार असून अनेक गरजू रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. रक्तदानाबरोबरच समाजात आरोग्य, सहकार्य आणि मानवतेचा संदेश पोहोचविणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विशेष म्हणजे संध्याकाळी उशिरापर्यंत रक्तदात्यांच्या मोठ्या रांगा कायम होत्या. वेळेच्या मर्यादेमुळे अखेर शिबिर बंद करण्याची घोषणा करावी लागली. अनेक नागरिक रक्तदानासाठी उत्सुक असूनही वेळ संपल्याने त्यांना परत जावे लागले.

या रक्तदान शिबिराला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख उपस्थितांमध्ये रोहितदादा पवार, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच डीसीपी मिलिंद मोहिते, डीसीपी अमोल झेंडे, डीसीपी ए. राजा यांच्यासह पोलीस अधिकारी व विविध शासकीय अधिकाऱ्यांनी शिबिराला भेट देत रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे कौतुक केले. विजयकांत कोठारी, ॲड. एस के जैन, विजय भंडारी, राजेश साकला, विलास राठोड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व समाजातील अनेक गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.