जावयाची सासू, सासरे, मेव्हण्यावर काळी जादू
कोंढव्यातील कौसरबागेतील कबरस्तानात मध्यरात्रीची घटना : नागरिकांच्या दक्षतेमुळे प्रकार आला उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आपली पत्नी पुन्हा आपल्यासोबत राहण्यासाठी तसेच सासरकडून पैसे मिळावेत, यासाठी जावई चक्क काळी जादू करत असल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यातील कौसरबाग येथील कबरस्तानात उघडकीस आला आहे. नागरिकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला.
याबाबत हसनेन रफिक जाफरानी (वय ४०, रा. फिरदोस सोसायटी, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी परवेज अब्दुल अजीज मेमन (रा. हिल मिस्ट गार्डन, कौसरबाग) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १९ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील कौसरबाग येथील कबरस्तानात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाफरानी यांच्या बहिणीचा निकाह परवेज मेमन याच्याशी झाला आहे. त्यांच्यात वाद झाल्याने पत्नी सध्या परवेज मेमन याच्यासोबत राहत नाही.
कोंढवा येथील कौसरबागमधील कबरस्तानात काही नागरिकांना मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांनी परवेज मेमन याला पकडले. त्यावेळी तो काही फोटोवर सुया टोचून काळी जादू करत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी संबंधित व्यक्तींबाबत विचारणा केली असता, ते फोटो त्याचा मेव्हणा, सासू, सासरे आणि मेव्हण्याच्या पत्नीचे असल्याचे समोर आले.
सासरकडील प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तू ही काळी जादू करतोस का, असे विचारत नागरिकांनी त्याला मारहाण करून कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिले. ही बाब हसनेन जाफरानी यांना समजल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी, गुरुवारी रात्री, कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर परवेज मेमन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक अमित कुंभार तपास करीत आहेत.
