भातंबरे येथे प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
अन्न सुरक्षा कायद्यान्वये वैराग पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर ( वैराग ) ; सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा व विक्रीविरोधात वैराग पोलिसांनी धडक कारवाई करत गुटखा माफियांना मोठा दणका दिला. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व तत्सम पदार्थांचा साठा करून विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी शेख हसिफ अल्लाउद्दीन (रा. आंबेहोळ, ता. जि. धाराशिव) याने मौजे भातंबरे येथील मारुती मंदिर परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दि. 21 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9.25 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर रात्री 7.17 वाजता वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कलम 26(2)(i), 26(2)(ii), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a), 59 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 274, 275 व 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना क्र. असुमाअ/अधिसूचना-411/2025/7 दिनांक 16 जुलै 2025 नुसार प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा व विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई वैराग पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी पार पाडली. पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत पेटकर यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून पुढील तपास पोसई जाधव करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा , अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अधिकारी रामानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
