आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नीलेश घायवळ टोळीतील सराईत गुंड जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 23, 2026
Spread the love

पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीचा सदस्य असलेला आणि ३ मोक्का गुन्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुंडाला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला यश आले आहे.

अभिजित उत्तम गोरडे (वय ३३, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डनजवळ, कोथरुड) असे या गुंडाचे नाव आहे. नीलेश घायवळ टोळीचा तो सक्रिय सदस्य आहे. नीलेश घायवळ टोळीवर गेल्या वर्षी कोथरुडमध्ये दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले होते.

त्यात याचाही समावेश होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही दाखल झाला होता. या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मोक्का कलम लावण्यात आले आहे.

गुन्हे शाखेची पथके फरारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना युनिट ३ च्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप शेळके आणि नितीन जगदाळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अभिजित गोरडे हा रात्रीच्या वेळी राहत्या घरी आलेला आहे.

या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी त्याच्या कोथरुडमधील संत ज्ञानेश्वर कॉलनीतील घराला वेढा दिला. त्यानंतर रात्रीच्या वेळी घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वीनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार संदीप शेळके, नितीन जगदाळे, बोडरे, तुपसौंदर, साठे, काटकर आणि वागस्कर यांनी केली.