आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भांडवलाकरिता पैसे घेऊन ३८ लाखांना घातला गंडा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 23, 2026
Spread the love

पुणे : व्यवसायाच्या भांडवलासाठी व्यावसायिकाकडून पैसे घेऊन काम केले. त्यानंतर भांडवल परत न करता पती-पत्नी फरार झाले. त्यांच्या वडिलांनी अगोदर शब्द दिला असतानाही आता शब्द फिरविला. परत पैसे मागायला आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाची ३८ लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

याबाबत मंगेश रमेश कदम (वय ३१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अप्पर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी इस्माईल अबू मणियार (रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर पोलीस चौकीजवळ, वडारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये सप्टेंबर २०२४ ते आजपर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ‘आर. के. एंटरप्रायजेस’ नावाची कन्स्ट्रक्शन फर्म आहे. ते कन्स्ट्रक्शन व डिमोलिशनची कामे करतात.

या कामानिमित्त त्यांची इस्माईल मणियार यांच्याशी ओळख झाली होती. गेली ५ ते ६ वर्षे त्यांची व्यावसायिक मैत्री आहे.

२०२४ मध्ये इस्माईल मणियार हे त्यांच्या कार्यालयात आले. बिल्डिंग डिमोलिशनची कामे मिळणार असून भांडवल गोळा करायला सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या घरच्यांनीही भांडवल गोळा करण्यास मदत केली.

इस्माईल मणियार याने ६ कामे मिळाली असून त्यासाठी ३५ ते ३८ लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी घरातील सोने-चांदी विकून तसेच काही जणांकडून हातउसने पैसे घेऊन सुरुवातीला १० लाख रुपये आणि नंतर लागतील तसे असे एकूण ३८ लाख रुपये इस्माईल मणियारला दिले.

काही दिवसांनी त्यांनी मणियारला फोन करून चौकशी केली असता, त्याने काही दिवसांत कामाचे बिल निघणार असून तुमचे भांडवल व त्याचा नफा देणार असल्याचे सांगितले.

त्यांना संशय आल्याने ते त्याच्या घरी गेले. तेव्हा त्याचे वडील अबू मणियार भेटले. त्यांनी सांगितले, “मी दरवेळी तुमच्या करारनाम्याला जबाबदार व्यक्ती म्हणून हजर होतो. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की, तुमचे सर्व पैसे ठरल्याप्रमाणे मिळून जातील. काळजी करू नका.”

इस्माईल याची पत्नी सुमिरा मणियार यांनीही त्यांना विश्वास देऊन एसबीआय बँकेचा चेक दिला. त्यावर विश्वास ठेवून ते वाट पाहू लागले.

त्यानंतर त्यांनी पैसे मिळण्यासाठी इस्माईल मणियार व त्याच्या कुटुंबियांना वारंवार फोन केले असता त्यांनी फोन उचलणे बंद केले. फिर्यादी यांनी प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली.

तेव्हा इस्माईल मणियार याने कामाच्या भांडवलाची व त्यातील फायद्याची रक्कम अगोदरच घेतल्याचे समोर आले. फिर्यादी त्याच्या घरी गेले असता, त्याचे वडील अबू मणियार यांनी इस्माईल मणियार व त्याची पत्नी घर सोडून गेल्याचे सांगितले.

त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. त्यावर अबू मणियार यांनी जीवे ठार मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

“तुला कोठे जायचे तेथे जा, माझे काही होणार नाही,” असे म्हणून त्यांना धक्काबुक्की करून घरातून हाकलून दिले. शेवटी फिर्यादी यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल माने तपास करीत आहेत.