आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 23, 2026
Spread the love

पुणे : येरवड्यात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला महागात पडले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक तसेच त्यांच्या मुलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी माजी नगरसेवक किशोर राजाराम विटकर (वय ५१), हर्षद किशोर विटकर (वय २८), गणेश पोपटराव ढोकळे (वय ४०), गणपत जिवराज पुरोहित (वय ५१), विकास मच्छिंद्र सोनवणे (वय ४०), रोहित मधुकर वैराळ (वय ३५, सर्व रा. येरवडा), तसेच रामेश्वर अरुण दुर्लेकर (वय ३२, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस मार्शल बलजीत थोरात यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर विटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असून, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील गाडीतळ परिसरात विटकर यांचे कार्यालय आहे. शुक्रवारी (२२ मे) कार्यालयासमोरील रस्त्यावर टेबल टाकून केक कापण्यात आला. विटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री एकच्या सुमारास आतषबाजी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.