रक्तदान महायज्ञानंतर स्वच्छतेचीही जबाबदारी
सिद्धी फाउंडेशनचा आदर्शवत उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : समाजसेवा म्हणजे केवळ मोठे उपक्रम आयोजित करणे नाही, तर कार्यक्रमानंतर सार्वजनिक ठिकाणांची जबाबदारीही तितक्याच संवेदनशीलतेने पार पाडणे होय, याचा आदर्श सिद्धी फाउंडेशन ने आपल्या रक्तदान महायज्ञानंतर दाखवून दिला.
अलीकडेच सिद्धी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान महायज्ञाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. हजारो रक्तदात्यांच्या सहभागातून मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. मात्र कार्यक्रम संपल्यानंतरही सिद्धी फाउंडेशनची टीम तेवढ्याच तत्परतेने सामाजिक जबाबदारी पार पाडताना दिसली.
रक्तदान शिबिर संपल्यानंतर संध्याकाळी साडेसातपासूनच कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. कार्यक्रमासाठी शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आलेले होर्डिंग, दिशादर्शक फलक, जाहिरात साहित्य तसेच मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्गांवरील सर्व साहित्य व्यवस्थित काढून घेण्यात आले. वापरण्यात आलेल्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्यही गोळा करून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.
विशेष म्हणजे रात्री ११.३० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शहरातील जवळपास ४० ठिकाणी लावण्यात आलेले सर्व होर्डिंग सिद्धी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उतरवून घेतले. अनेकदा कार्यक्रम संपल्यानंतर बॅनर व होर्डिंग रस्त्यांवर पडून राहतात, शहराचे सौंदर्य खराब होते; मात्र सिद्धी फाउंडेशनने जबाबदार सामाजिक संस्थेची भूमिका निभावत वेगळा आदर्श निर्माण केला.
रक्तदानासारखा मानवतेचा संदेश देणारा उपक्रम आणि त्यानंतर शहर स्वच्छ ठेवण्याची घेतलेली काळजी यामुळे सिद्धी फाउंडेशनचे कार्य सध्या समाजात विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे. सामाजिक कार्यासोबत जबाबदारी आणि व्यवस्थापन यांचा सुंदर समतोल संस्थेने यानिमित्ताने दाखवून दिला आहे.
“समाजातील विविध संस्था, प्रतिष्ठान आणि नागरिक आपल्या चांगल्या कार्यासाठी सहकार्य करत असतात. त्यामुळे कार्यक्रमानंतर ती जागा जशी मिळाली, त्यापेक्षा अधिक स्वच्छ करून परत देणे हे प्रत्येक संस्थेचे आणि प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. समाजसेवा करताना स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. – मनोज छाजेड
