पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी : गुन्ह्यांचे शतक पार केलेल्या अजयसिंग दुधानीकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने तिघांना जेरबंद केले. तर तिघेजण पसार झाले. गुन्ह्यांचे शतक पार केलेल्या सराईत गुन्हेगार अजयसिंग दुधानी याच्याकडून एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय २६, रा. भापकर वस्ती, मांजरी, हडपसर), रामजितसिंग रणजितसिंग टाक (वय २७, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि अभयसिंग सिंकदसिंग जुनी (वय २१, रा. सुखकर्ता कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तर रोशन घाडगे (रा. मांजरी खुर्द), शंकरसिंग टाक आणि समीर ऊर्फ कमांडो (दोघे रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) हे तिघे पसार झाले आहेत. याबाबत पोलीस हवालदार अमित दत्तात्रय कांबळे (वय ४०) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक १० जून रोजी रात्री अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी अमित कांबळे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, अजयसिंग दुधानी व त्याचे साथीदार होंडा कारसह भापकर मळा येथे थांबलेले आहेत.
या माहितीनुसार पोलिसांचे पथक भापकर मळा येथे पोहोचले. त्यावेळी त्यांना एक होंडा कार जाताना दिसली. त्यांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारचालक वेगाने पळून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला.
रेल्वे पुलाजवळ पोलिसांनी वेगाने गाडी पुढे नेऊन त्यांच्या कारला आडवी घालून थांबविण्यास भाग पाडले. यावेळी कारमधील तिघेजण पळून गेले.
मात्र, इतर तिघांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. अजयसिंग दुधानी, रामजितसिंग टाक आणि अभयसिंग जुनी यांना ताब्यात घेण्यात आले.
“इतक्या रात्री कुठे जात होतात?” असे विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांनी अजयसिंग दुधानी याची झडती घेतली.
त्याच्या पँटच्या खिशात चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारच्या पुढील डाव्या बाजूच्या बॉक्समध्ये गावठी बनावटीचे पिस्टल मिळाले.
तसेच कारमधील मधल्या सीटच्या पॅसेजमध्ये सहा घातक हत्यारे, मिरची पूड व दोरी आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, “आम्ही सर्वजण मिळून फुरसुंगी फाटा येथे सोलापूर रोडवरून येणाऱ्या गाड्या लुटणार होतो तसेच रात्री उघडा असलेला पेट्रोलपंप लुटण्याचा आमचा बेत होता,” अशी कबुली त्यांनी दिली.
आरोपींकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, हत्यारे व कार असा एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे करीत आहेत.
गंभीर गुन्हा करण्यापूर्वीच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या – अजयसिंग दुधानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर तब्बल ६० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रात एकूण ९१ तर इतर राज्यांत १९ गुन्हे दाखल आहेत. रामजितसिंग टाक याच्यावर ९ गुन्हे दाखल असून अभयसिंग जुनी याच्यावर ६ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांकडे पिस्टल असल्याने त्यांच्याकडून मोठा गुन्हा घडण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक करून एक गंभीर गुन्हा रोखण्यात यश मिळविले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, समीर पांडुळे, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर तसेच पोलीस अंमलदार शेखर काटे आणि गणेश माने यांनी केली.
