पूर्ववैमनस्यातून जिम मालकावर गोळीबार
दोन गोळ्या लागल्या, कोयत्यानेही वार : सहकारनगरातील घटना, चौघे ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून जिम मालकावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सहकारनगर येथील बिकानेर चौकात घडली. या हल्ल्यात जिम मालक योगेश बानेकर यांना दोन गोळ्या लागल्या असून हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
योगेश महेश बानेकर (वय ३५, रा. केतकी अपार्टमेंट, सहकारनगर क्र. २) असे जखमी जिम मालकाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आदित्य विष्णू थोपटे (वय २१, रा. जनता वसाहत) याला अटक करण्यात आली आहे.
ही घटना बुधवारी रात्री सुमारे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बिकानेर चौकात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बानेकर हे जिम व्यवसायिक असून ते रात्री बिकानेर चौकात फळे खरेदी करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आदित्य थोपटे व त्याचे आणखी तीन साथीदार दुचाकींवरून तेथे आले. त्यांनी योगेश यांच्या दिशेने तीन राऊंड गोळीबार केला. योगेश खाली वाकल्याने एक गोळी त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला लागली, तर दुसरी गोळी त्यांना चाटून गेली.
गोळीबारानंतर योगेश बानेकर तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींपैकी एकाने, “याला पळून जाऊ देऊ नका, याची विकेट टाकायची आहे, पकडा त्याला,” असे म्हटले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले आणि कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले.
जखमी योगेश बानेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, मिलिंद मोहिते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सहकारनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून काही वेळातच आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर शोधमोहीम राबवून अवघ्या दोन तासांत चौघांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी जनता वसाहत परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे करीत आहेत.
