‘संपूर्ण गीत रामायण’ मधून पुणेकरांनी अनुभवले रामराज्य
पारंपरिक वातावरणात रंगला तीन दिवसीय सांगीतिक महोत्सव : आनंद माडगूळकरांचा विशेष सत्कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या सुरेल स्वरसाजातून साकारलेल्या अजरामर ‘गीत रामायण’च्या ७१ व्या वर्षानिमित्त पुण्यात ‘संपूर्ण गीत रामायण’ या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदिशा विचार मंच, कोहिनूर कट्टा आणि जयराज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या पुणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक माता-भगिनींना गजरा, तर पुरुषांना सोनचाफ्याचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. सनई-चौघड्यांच्या मंगल स्वरांत आणि भक्तिमय वातावरणात रसिकांनी ‘संपूर्ण गीत रामायण’चा भावपूर्ण अनुभव घेतला.
हा तीन दिवसीय महोत्सव २६ मे २०२६ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.
यावेळी गीत रामायणाचा ध्यास घेत संपूर्ण आयुष्य या कलाकृतीसाठी वाहून घेणारे गदिमांचे सुपुत्र, गीत रामायण गायक तसेच ‘गीत रामायण’ आणि ‘भावार्थ गीत रामायण’ या पुस्तकांचे लेखक आनंद माडगूळकर यांचा उल्हासदादा पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, जयराज ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेश शहा तसेच विदिशा विचार मंचचे समन्वयक नितीन जळूकर उपस्थित होते.
उल्हास पवार यांनी मनोगतात सांगितले की, “‘गीत रामायण’ ही केवळ गीतमालिका नसून मराठी संस्कृतीचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे. १९५५-५६ दरम्यान आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रथम प्रसारित झालेल्या या गीतमालिकेने अनेक पिढ्यांना संस्कार, आदर्श आणि भक्तीचा संदेश दिला आहे.”
कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल म्हणाले, “मराठी साहित्य आणि संगीतविश्वातील अजरामर कलाकृती म्हणून ‘गीत रामायण’ आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या गीतमालिकेने मराठी सांस्कृतिक विश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे.”
जयराज ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी सांगितले की, “‘गीत रामायण’ हे केवळ गीतांचे संकलन नसून मराठी मनाच्या भावविश्वाला समृद्ध करणारे सांस्कृतिक महाकाव्य आहे.”
सत्काराला उत्तर देताना आनंद माडगूळकर यांनी गीत रामायणाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सद्गुरू ग्रुपचे यशवंतराव कुलकर्णी आणि प्रणव कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.
या तीन दिवसीय महोत्सवात गीत रामायणातील ५६ गीतांचे निरूपण आणि गायन आनंद माडगूळकर करीत असून त्यांच्यासमवेत अभिजीत पंचभाई, हेमंत वाळुंजकर, राजेश दातार, मीनल पोंक्षे, श्रेया माडगूळकर-सरपोतदार आणि मनीषा निश्चल सहभागी झाले आहेत. कोरससाठी अवंतिका साठे आणि राखी दातार यांची साथ लाभत आहे.
वाद्यवृंदाची साथ आनंद गोडसे, राजेंद्र हसबनीस, अवधूत धायगुडे, प्रसन्न बाम आणि केदार परांजपे हे कलाकार करीत आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंद गोडसे, ध्वनी संयोजन सागर खांबे यांनी केले असून महोत्सवाचे संयोजन श्रीकांत कुलकर्णी आणि राजेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. नेपथ्याची जबाबदारी मोहन रत्नपारखी यांनी सांभाळली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन जळूकर यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजेश दामले यांनी केले.
