बुधवार पेठेत मोठी कारवाई : ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात
डीसीपी ऋषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार २४ मे २०२६ रोजी रात्री शहरभर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान बुधवार पेठ परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. डीसीपी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सागर बिल्डिंग परिसरात छापा टाकून भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले.
गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित महिलांकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान या महिलांना ब्युटी पार्लर, शिवणकाम किंवा घरकामाच्या नोकरीचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आल्याचे समोर आले. मात्र, बुधवार पेठेत आल्यानंतर त्या स्वेच्छेने देहविक्री व्यवसायात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात संबंधित महिलांना भारतात आणणारे एजंट, त्यांनी सीमारेषा कशा ओलांडल्या तसेच बनावट कागदपत्रांची व्यवस्था कोणी केली, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे, डीसीपी ऋषिकेश रावले यांनी झोन १ चा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवायांना मोठी गती मिळाली आहे. अवघ्या ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून, हा आकडा शतक पार करणारा ठरला आहे. शहरातील बेकायदेशीर वास्तव्य, मानवी तस्करी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी रावले यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने कठोर मोहिमा राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, डीसीपी ऋषिकेश रावले हे एका महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी आज रात्री हैदराबादला रवाना होत असून जून अखेरीस ते पुण्यात परतणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत डीसीपी मुख्यालय पी. आर. पाटील यांच्याकडे तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
