ट्रकला धडक देणाऱ्या मद्यपी कारचालकावर गुन्हा
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून फोडला मोबाईल : मुंढव्यातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत कारचालकाने भरधाव कार चालवत ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल फोडत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या कारचालकावर मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. पानमंद वस्ती, म्हस्केवाडी, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
याबाबत पोलीस अंमलदार प्रशांत नायडू यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मुंढवा रेल्वे पुलाजवळील कोणकर वजन काट्यासमोर २३ मे रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ज्वल म्हस्के हा दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत होता. त्याने ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अंमलदार नायडू घटनास्थळी पोहोचले.
त्यावेळी म्हस्के आरडाओरडा करत होते. पोलिसांना पाहताच तो म्हणाला, “तुम्ही पोलीस विकले गेले आहेत. बलात्कार होतो तेथे तुम्ही येत नाही आणि येथे येऊन आम्हाला त्रास देता,” असे म्हणत त्याने पोलिसांना शिवीगाळ केली.
फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन जमिनीवर आपटून फोडला. तसेच पोलिसांबाबत अर्वाच्य भाषेत बोलून फिर्यादींना हाताने मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सुरवसे पुढील तपास करीत आहेत.
