जादा परताव्याच्या आमिषाने महिलेची १६ लाखांची फसवणूक
जमीन विक्रीतून आलेले पैसे भांडवल म्हणून घेतले : फसवणुकीच्या धक्क्याने पतीचे निधन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जमीन विक्रीतून आलेले पैसे भांडवल म्हणून गुंतविण्यास कुटुंबाने सुरुवातीला नकार दिल्याने पतीला दारू पाजून फितवून २० लाख रुपये घेतले. केवळ ४ महिने परतावा दिल्यानंतर फसवणूक करण्यात आली. या धक्क्याने पतीचे निधन झाले. पाच वर्षांनंतरही पैसे न मिळाल्याने अखेर महिलेने लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिली.
याबाबत पूनम प्रमोद पवार (वय ५०, रा. अजमेर हौसिंग कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी अतुल श्यामराव पवार (रा. स्वामी अंगण बिल्डिंग, नऱ्हे, मूळ रा. नांदवळ, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि संतोष सुरेश काकडे (रा. स्वप्नपूर्ती पार्क, राहीज वस्ती, लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना लोणी काळभोरमधील कुशल वाटिका येथे २६ ऑगस्ट २०२० ते ४ डिसेंबर २०२० दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पतीने २०२० मध्ये चार एकर शेती जमीन विकली होती.
त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले होते. याची माहिती अतुल पवार याला होती. त्यावेळी त्याचे मांजरी फार्म येथे ‘वर्ल्ड ट्रेडिंग कंपनी’ नावाचे बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान होते.
जमिनीचा व्यवहार झाल्याचे समजताच तो पत्नी कोमल पवार हिच्यासह पूनम पवार यांच्या घरी आला. जेवण झाल्यानंतर त्यांनी थेऊर फाटा येथील सात गुंठे जागा विकत घेण्याबाबत प्रस्ताव मांडला. मात्र, फिर्यादींनी त्यास नकार दिला.
त्यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांचा मित्र संतोष काकडे याचे नागार्जुन ग्रुप कंपनी व पुणे मेट्रो कंपनीशी टायअप असून, आपण भांडवल उपलब्ध करून दिल्यास दर महिन्याला २० टक्के नफा परतावा म्हणून मिळेल.
यालाही फिर्यादींनी स्पष्ट नकार दिला. तरीदेखील अतुल पवार वारंवार घरी येऊ लागला. त्याने फिर्यादींच्या पतीला दारू पाजून फितवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले.
अखेरीस १६ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी २० लाख रुपये अतुल पवार यांच्या ‘वर्ल्ड ट्रेडिंग कंपनी’च्या नावे दिले. त्यानंतर चार महिने त्यांनी दरमहा एक लाख रुपये, असा एकूण चार लाख रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर त्यांनी पैसे देणे बंद केले.
फिर्यादींचे पती प्रमोद पवार हे सतत अतुल पवार याच्याकडे पैशांची मागणी करू लागले. त्यावेळी अतुल पवार त्यांना संतोष काकडे यांच्या घरी घेऊन गेला.
पैशांचा विषय निघाल्यानंतर संतोष काकडे याने “तुम्ही माझ्या घरी का आलात? तुम्ही मला पैसे दिले आहेत का? तुम्ही अतुल पवार याच्याकडूनच पैसे घ्या,” असे म्हणत त्यांना घरातून उठवून शिवीगाळ करत हाकलून दिले. तसेच त्यांच्या पतीला मारहाण केली.
त्यानंतर ते घरी आले. या घटनेचा फिर्यादींचे पती प्रमोद पवार यांनी मोठा धसका घेतला आणि त्यातून त्यांचे निधन झाले. त्यानंतर फिर्यादींनी अतुल पवार याच्याकडे वारंवार पैशांबाबत विचारणा केली.
मात्र, तो प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करू लागला. २०२३ मध्ये त्याने फोनवरून फिर्यादींना शिवीगाळ करून धमकी दिली होती.
अखेर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक बोराटे पुढील तपास करीत आहेत.
