’त्या’ सोनेरी आठवणींना उजाळा… २००१-०२ च्या दहावीच्या बॅचचे दुसरे स्नेहसंमेलन उत्साहात
’जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर; जिल्हा परिषद शाळा आणि महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची मांदियाळी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पारगाव : दहावीचे ते सोनेरी दिवस, वर्गमित्रांसोबत केलेली धम्माल आणि गुरुजनांचा तो आदरयुक्त दरारा… या सगळ्या जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा देत सन २००१ – २००२ मधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ‘गेट टू गेदर’ (स्नेहसंमेलन) नुकतेच अत्यंत उत्साही आणि भावुक वातावरणात संपन्न झाले. विशेष म्हणजे, यंदाचे या बॅचचे हे सलग दुसरे वर्ष होते. पहिल्या वर्षी ठरल्याप्रमाणे, याही वर्षी अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि वर्गमित्र-मैत्रिणींच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे या सोहळ्याची रंगत अधिकच वाढली..
शाळेच्या आठवणी आणि घोषणांचा जल्लोष – कार्यक्रमाची सुरुवात अतिशय अनोख्या पद्धतीने झाली. सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गावातून एक उत्साही फेरी काढली. यावेळी ‘जय जवान, जय किसान’ आणि ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. ही फेरी विद्यार्थ्यांनी पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहोचली. तिथे सर्व मित्रांनी बालपणीच्या वर्गांची आणि शाळेच्या परिसराची आस्थेने पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ मोटे आणि सलीम शेख यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना शाळेत होत असलेली गुणवत्ता वाढ आणि परिसर सुधारणेबाबत सविस्तर माहिती दिली. शाळेचा झालेला कायापालट पाहून माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांचे कौतुक करत त्यांचे विशेष आभार मानले.
महात्मा फुले विद्यालयात रंगला मुख्य सोहळा – जि. प. शाळेच्या भेटीनंतर स्नेहसंमेलनाचा मुख्य कार्यक्रम ‘महात्मा फुले विद्यालय’ येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालायाचे मुख्याध्यापक बडे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन अभिजित डूगरवाल यांनी केले. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रा. सुभाष लादे, प्रा. शिवाजी माने, बजरंग मोरे आणि धोंडीराम बटूळे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, या विद्यालयात कार्यरत असणारे प्रा. मांजरे, बाळासाहेब जाधव, सोमनाथ काळे आणि सोमा सोनवणे यांनी हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी विद्यालय उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले.
मनोगतातून वाहिला आठवणींचा झरा – या भावनिक सोहळ्यात अमोल गावडे, राहुल डोके, संतोष शेंडगे,गणेश लाखे, संजीवनी हावळे, बानू गायकवाड आणि राज डोके यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित गुरुवर्य प्रा. लादे सर, बटूळे सर आणि अध्यक्षीय भाषणातून बडे सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, आयुष्यात मैत्रीचे नाते असेच टिकवून ठेवण्याचा संदेश दिला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुदर्शन नारटा,शरद मोटे,संतोष धनवे, पोपट भराटे,प्रशांत मोटे यांनी मोटे परिश्रम घेतले.प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी सुदर्शन नारटा यांचा सत्कार करण्यात आला.
खो-खो, अंताक्षरी आणि पुढच्या वर्षीचा संकल्प – वर्षोनुवर्षानंतर एवढ्या मोठ्या संख्येने वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र आल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे भरते आले होते. वय विसरून सर्वांनी मैदानावर ‘खो-खो’चा आनंद घेतला, तर संगीतमय ‘अंताक्षरी’ खेळून जुन्या गाण्यांमध्ये सर्वजण रमून गेले. दुपारी सर्वांनी एकत्र बसून चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. शेवटी सायंकाळी ठीक ४ वाजता या अविस्मरणीय सोहळ्याचा समारोप झाला. निरोपा वेळी’पुढच्या वर्षीही याच ताकदीने आणि याच उत्साहाने पुन्हा एकत्र यायचे’ असा ठाम संकल्प करत सर्व मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतला. या यशस्वी सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
