अमृत 2.0 जनजागृती रथाचे संयोगिता गाढवे यांच्या हस्ते उद्घाटन
लोककलेच्या माध्यमातून नागरिकांना योजनेची माहिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत 2.0’ योजनेच्या जनजागृती अभियानांतर्गत नगर परिषद कार्यालयासमोर आलेल्या जनजागृती रथाचे उद्घाटन शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहरातील नागरिकांपर्यंत ‘अमृत 2.0’ योजनेची संपूर्ण माहिती लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचावी, तसेच या योजनेबाबत व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कला समूहाने “जागर महाराष्ट्राच्या” या कार्यक्रमाद्वारे विविध लोककलांचे सादरीकरण केले. पोवाडे, भारुड आणि लोकगीतांच्या माध्यमातून कलाकारांनी योजनेचे महत्त्व नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमात मुक्ताई कला मंचचे प्राध्यापक रुपेश ठाकूर यांचा नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक तौफिक कुरेशी, नगरसेविका रीमा शिंदे, भाग्यश्री माने, सामाजिक कार्यकर्ते मुशीर शेख, एजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा आलमप्रभू शहर विकास आघाडीचे प्रवक्ते अख्तर जमादार, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
