आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांचा छापा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 26, 2026
Spread the love

पुणे : दुबईस्थित कंपनी असल्याचे भासवून कॉल सेंटरसाठी प्रोजेक्ट आणि सेटअप उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली तब्बल ७० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली आहे.

खुशी कौशल परमार ऊर्फ सान्वी शहा (रा. सरदार चौक, जोधपूर, राजकोट, गुजरात) आणि तुषार महेशकुमार तलपाडा (रा. विशाल रेसिडेन्सी, अहमदाबाद, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी खराडी येथील ‘तिरोहा स्ट्रॅटेजी प्रा. लि.’ या कंपनीच्या संचालकांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची कंपनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी ग्राहक सेवा देण्याचे काम करते.

जानेवारी २०२६ मध्ये फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवर ‘सीट्रिक्स प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कन्सलटंट एलएलसी, दुबई’ या कंपनीची जाहिरात दिसली. संबंधित कंपनीने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म, कार रेंटल आणि ई-कॉमर्स या तीन प्रोजेक्टवर काम देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी अनुक्रमे ७ लाख ५३ हजार, १८ लाख ५४ हजार आणि १२ लाख ५३ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादी यांनी संबंधित रक्कम ऑनलाइन पाठवली.

यानंतर २७ मार्च २०२६ रोजी दुबईतील ऑक्सफर्ड टॉवर, बिझनेस बे येथे एरिका स्मीथ आणि जस्प्रीत कौर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी कॉल सेंटरचा सेटअप उभारण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जागा भाड्याने घेऊन सुमारे ४१ लाख ४० हजार रुपये खर्च करून कार्यालय उभारले.

मात्र, ‘सीट्रिक्स’ ही कंपनी प्रत्यक्षात दुबईत नसून अहमदाबादमध्ये कार्यरत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी खराडी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला. तपासात ‘प्रमोटप एचआर सोल्युशन’ या नावाने अहमदाबादमध्ये अनधिकृत कंपनी सुरू करून फसवणूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. तेथून १ लाख ९८ हजार रुपयांचे संगणक सीपीयू, लॅपटॉप, मोबाईल फोन, सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन तसेच दुबईस्थित ‘सीट्रिक्स’ कंपनीच्या नावाने वापरण्यात येणाऱ्या संभाषणाच्या स्क्रिप्टची कागदपत्रे जप्त करण्यात आली. दोघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि त्यांच्या पथकाने केली.

नोकरी सोडलेल्या महिलेने फोडले बिंग
‘सीट्रिक्स’ कंपनीत काम करणाऱ्या दिया भट या महिलेने कंपनी सोडल्यानंतर ३१ मार्च २०२६ रोजी फिर्यादी यांना फोन करून संपूर्ण प्रकार उघड केला. कंपनीकडे कोणतेही प्रोजेक्ट नसून ती बनावट असल्याचे तिने सांगितले. तसेच ही कंपनी दुबईची नसून अहमदाबादस्थित ‘प्रमोटप एचआर सोल्युशन्स’ नावाने कार्यरत असल्याचेही स्पष्ट केले. “आम्ही अहमदाबादमधून दुबई कॉल सेंटर असल्याचे भासवून लोकांना फोन करत होतो,” अशी माहितीही तिने दिली. खुशी परमार, पार्शिव सिंग ऊर्फ सिद्धार्थ, कशिश शर्मा, श्रुती ऊर्फ रचना उमेश खुराणा, एरिका स्मीथ ऊर्फ रिचा, जस्प्रीत कौर ऊर्फ वर्षा आणि तुषार पटेल हे या कंपनीत कार्यरत असल्याचेही तिने सांगितले. तिच्या माहितीमुळे फिर्यादी यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला आणि पोलिसांनी पुढील कारवाई केली.