आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून २५ लाख ९० हजारांची रोकड लांबवली

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 26, 2026
Spread the love

पुणे : व्यवसायातील रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात असलेल्या तरुणाच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर स्प्रे मारून दोन चोरट्यांनी तब्बल २५ लाख ९० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना धनकवडी येथे घडली. चोरट्यांनी रेकी करून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी अनिकेत मानुक कदम (वय ४७, रा. विद्याधन सोसायटी, चव्हाण कॉम्प्लेक्स, राजे चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सोमवारी (२५ मे) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर येथील धनकवडी टपाल कार्यालयाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत कदम यांचा परकीय चलन विनिमयाचा व्यवसाय आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत जमा झालेली रोकड ते सोमवारी बँकेत जमा करत असतात. त्यानुसार त्यांनी १० लाख रुपये शिल्लक ठेवून २५ लाख ९० हजार रुपये एका बॅगेत भरून पीडीसीसी बँकेत जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

धनकवडी टपाल कार्यालयाजवळील गल्लीत दोन चोरटे दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले. त्यांनी कदम यांच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची तीव्र जळजळ सुरू झाली आणि त्यांनी दुचाकी थांबवली. त्याच क्षणी चोरट्यांनी दुचाकीला लावलेली रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.