शासकीय आदेश धुडकावणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल
मतदार यादी पुनर्परीक्षण मोहिमेत काम करण्यास नकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभर विशेष मतदार यादी पुनर्परीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सोपविण्यात आलेल्या शासकीय कामास नकार देणाऱ्या शिक्षकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र हरिचंद्र थोपटे (रा. आंबेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते आंबेगाव येथील प्रेरणा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याबाबत तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी अमोल बारहाते (वय ३२, रा. दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने २००२ च्या मतदार यादीतील मतदारांची २०२४ च्या मतदार यादीशी पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. संबंधित मतदार कोणत्या मतदान केंद्रात नोंदणीकृत आहेत, याची शहानिशा करण्यासाठी रवींद्र थोपटे यांच्याकडे बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून काम सोपविण्यात आले होते.
हे काम शाळेतील दैनंदिन कामकाज सांभाळून करायचे होते. यासाठी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी त्यांना लेखी आदेशही दिले होते. मात्र, त्यानंतरही थोपटे यांनी बीएलओ अॅपमध्ये नोंदणी केली नाही किंवा त्यांना सोपविण्यात आलेले काम सुरू केले नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी आदेशांचे पालन केले नाही. अखेर शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
