जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची पेट्रोल पंपांवर अचानक तपासणी
इंधन टंचाई, काळाबाजार रोखण्यासाठी कंपन्यांना कडक इशारा : जिल्हाभर संयुक्त भरारी पथके सक्रिय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांनी जिल्ह्याला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध ठेवावा आणि शहरी तसेच ग्रामीण भागात दैनंदिन मागणीनुसार इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले. पेट्रोल व डिझेलच्या कृत्रिम टंचाईसह काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून जिल्हाधिकारी यांनी स्वतः पंढरपूर येथील पेट्रोल पंपावर अचानक तपासणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात (दि. 25) पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार, बीपीसीएलचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण यादव व संजयकुमार, एचपीसीएलचे सागर चव्हाण व निकीत रेड्डी, आयओसीएलचे सागर गौतम व तन्मय आनंद तसेच आयएमसीएल कंपनीचे नंदकिशोर अडसुळे व अनिल करीर उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी काही पेट्रोल विक्रेत्यांकडून कंपन्या दररोज मर्यादित प्रमाणातच पेट्रोल-डिझेल विक्री करण्याचे बंधन घालत असल्याच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या. “जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही पेट्रोल विक्रेत्यावर इंधन विक्रीचे निर्बंध घालू नयेत. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते,” असा इशारा त्यांनी कंपन्यांना दिला. पुढे अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्यासह सोलापूर शहर व ग्रामीण भागातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून अतिरिक्त इंधन साठवणूक करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी केले. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन साठा करून ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सीएनजी गॅस पुरवठ्यातही मागणीनुसार वाढ करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सर्व कंपन्यांचा सविस्तर आढावा घेतला. पेट्रोल व डिझेलची रोजची मागणी, त्यानुसार होणारा पुरवठा, गॅस वितरण व्यवस्था आणि उपलब्ध साठा याविषयी माहिती घेण्यात आली. कंपन्यांकडून किमान सात दिवसांचा पेट्रोल व डिझेलचा बफर स्टॉक ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मागणीनुसार दररोज नियमित इंधन पुरवठा होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व डीलर आणि विक्रेत्यांच्या अडीअडचणी जाणून घेत ग्राहकांना सुरळीत इंधन पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी काही पेट्रोल पंप चालकांकडून ड्रममधून किंवा एकाच व्यक्तीला मोठ्या प्रमाणात इंधन विक्री होत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत असल्याचे सांगितले. अक्कलकोट, करमाळा आणि बार्शी तालुक्यांत इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याने त्या भागातील पेट्रोल पंप सुरू राहतील यासाठी कंपन्यांनी पुरेसा पुरवठा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या अनाधिकृत साठवणुकीसह काळाबाजार रोखण्यासाठी आणि काही पेट्रोल पंपांवर शॉर्ट सेलिंग सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी आज पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपाची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान सर्व बाबी व्यवस्थित असल्याचे आढळून आले.
याचबरोबर सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंपांची नियमित तपासणी करून ग्राहकांना सुरळीत इंधन पुरवठा मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
तालुकानिहाय संयुक्त भरारी पथके स्थापन
पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी लागणाऱ्या रांगांमुळे काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तालुकानिहाय संयुक्त भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकांमध्ये तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पोलिस निरीक्षक कायदा व सुव्यवस्था प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. निरीक्षक अधिकारी किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे तांत्रिक तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक, सहाय्यक महसूल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचाही या पथकात समावेश करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपांच्या ‘कॅलिब्रेशन’ तपासणीचे आदेश
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील इंधन मोजमाप यंत्रणेची अचूकता तपासण्याचे आदेशही जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी दिले आहेत. वजन व मापे विभागाने सर्व पेट्रोल पंपांचे ‘कॅलिब्रेशन’ योग्य पद्धतीने झाले आहे की नाही याची तपासणी करावी. ज्या पेट्रोल पंपांवरील मोजमापात त्रुटी आढळतील त्यात तत्काळ दुरुस्ती करून अचूक प्रमाणात इंधन वितरण सुनिश्चित करावे, असे निर्देश उपायुक्त वजन व मापे विभागाला देण्यात आले आहेत.
