बार्शीत तालुका कृषी विभागाची मोठी कारवाई : 7.52 लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त
हुबेहूब बनावट पॅकिंग उघडकीस : हजारो शेतकरी फसवणुकीपासून बचावले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका कृषी विभागाने बोगस उडीद बियाणे विक्रेत्याविरोधात धडक कारवाई करत तब्बल 7 लाख 52 हजार 640 रुपयांचे बनावट बियाणे जप्त केले. या कारवाईमुळे हजारो शेतकरी आर्थिक फसवणुकीपासून वाचल्याची भावना व्यक्त होत आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मंगळवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास बोगस उडीद बियाणे विक्रीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने तातडीने कारवाई करत स्वराज कॉलनी, बार्शी येथील गोडाऊनवर छापा टाकला.
या वेळी स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) चे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या उडीद पिकाच्या NUL-7 (विश्वास) या वाणाच्या बॅगची हुबेहूब नक्कल करून बोगस बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या 216 बॅग तसेच आधीच विक्री झालेल्या 168 बॅग अशा एकूण 384 बॅग (प्रति 5 किलो) बियाण्यांचा तपास करण्यात आला. प्रति बॅग 1960 रुपये दराने एकूण 7 लाख 52 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्राचार्य भोसले तसेच कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी संजय वाकडे यांच्या समन्वयातून जिल्हास्तरीय भरारी पथकाने कारवाई पार पाडली.
कारवाईमध्ये तालुका कृषी अधिकारी बार्शी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी बार्शी गणेश पाटील, निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, शरद साळवे आदी उपस्थित होते.
दरम्यान, संबंधित बोगस बियाणे विक्रेत्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कृषी विभागाच्या या धडक कारवाईचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
