एकाच प्लॉटची दुबार विक्री करून फसवणूक
दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून नुकसान: जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मांगडेवाडी परिसरात एकाच प्लॉटची दोघांना विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच संबंधितांनी दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून कंपाऊंड तोडत आर्थिक नुकसान केले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत नानासाहेब आत्माराम देवकर (वय ४५, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी ज्ञानोबा एकनाथ मांगडे (रा. कात्रज), वसंत धर्माधिकारी यांचा मुलगा, कमल सुरेश तनपुरे (वय ६५, रा. मुंबई), विठ्ठल सुरेश तनपुरे (वय ३५, रा. मुंबई) आणि चंदन लक्ष्मण राठोड (वय ४७, रा. आंबेगाव पठार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मांगडेवाडी येथील सर्व्हे क्रमांक १० मधील प्लॉट क्रमांक १ ते ५ परिसरात २०२२ पासून घडत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब देवकर यांनी २०१८ मध्ये शामकांत नामदेव गायकवाड यांच्याकडून मांगडेवाडी येथील सर्व्हे क्रमांक १० मधील प्लॉट क्रमांक १ मधील एक आर जागा खरेदीखताद्वारे विकत घेतली होती.
त्यानंतर प्लॉटिंग लेआउट आणि खरेदीखतांची पाहणी केली असता, मूळ जमीनमालक ज्ञानोबा मांगडे यांनी एकाच जागेची दुबार विक्री केल्याचे निदर्शनास आले.
१९८८ ते २०१९ या कालावधीत या जागेचे अनेक व्यवहार झाले होते. त्यामध्ये प्लॉट क्रमांक १ आणि ३ हे प्रथम शामकांत गायकवाड यांना व नंतर वसंत धर्माधिकारी यांना विकण्यात आले होते.
तसेच प्लॉट क्रमांक ४ आणि ५ हे प्रथम रोहीदास खांदवे यांना व नंतर राजेंद्र धर्माधिकारी यांना विकल्याचे समोर आले आहे. ही बाब २०२१ मध्ये नानासाहेब देवकर यांनी कमल तनपुरे यांचा मुलगा, चंदन राठोड आणि वसंत धर्माधिकारी यांच्या मुलाच्या निदर्शनास आणून दिली होती.
मात्र, “आम्ही जागा मालकाविरोधात तक्रार करणार नाही आणि जागाही सोडणार नाही,” अशी दमदाटी करून त्यांनी फिर्यादी तसेच इतर प्लॉटधारकांच्या जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप आहे.
फिर्यादींच्या जागेवरील कंपाऊंड तोडून नुकसान करण्यात आले. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या सहकारी प्लॉटधारकांना जागेत जाण्यास मज्जाव करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.
