बेकायदेशीर पशुबळीप्रकरणी कडक कारवाईचे निर्देश
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पुणे पोलिसांना पत्र
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच निवासी सोसायट्यांमध्ये विनापरवानगी पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार आयोजित केले जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस प्रशासनाला अशा बेकायदेशीर प्रकारांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “मीराभाईंदर परिसरासह पुण्यातील काही भागांमध्ये सार्वजनिक स्वरूपात पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी, महापालिका आरोग्य विभागाचा परवाना किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे.”
“पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. अशा बेकायदेशीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे प्रशासनाने वेळेत कठोर पावले उचलून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही माधुरी मिसाळ यांनी म्हटले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा निवासी सोसायट्यांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय पशुकत्तल होऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच अशा अनधिकृत प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा पाठिंबा देणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पुणे पोलीस, महापालिका आरोग्य विभाग, संबंधित समाजघटक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त समन्वय बैठक तातडीने आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, पुण्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन या पत्रावर कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
