निर्भया पथकाची बार्शीत मटका अड्ड्यावर धाड : सहा जणांविरुद्ध गुन्हा
तेलगिरणी चौक परिसरातील कारवाईत 1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरात अवैध मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 404/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून निर्भया पथकामधील पो.कॉ. हनुमंत लिंबाजी पाडुळे यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये 1) गणेश सोमनाथ पिसे (वय 33, रा. सुभाष नगर, बार्शी), 2) सुदेश पांडुरंग कोळपे (वय 36, रा. सुभाष नगर, बार्शी), 3) विजय दत्ता गवळी (वय 28, रा. खुरपे बोळ, बार्शी), 4) अमोल भास्कर पवार (वय 42, रा. राऊत चाळ, बार्शी), 5) दिनकर अर्जुन कांबळे (वय 44, रा. तांदुळवाडी रोड, कळंब, जि. धाराशिव) आणि 6) अजिंक्य श्रीकांत पिसे (रा. सुभाष नगर, बार्शी) यांचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 27 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बार्शी-लातूर रोडवरील तेल गिरणी चौक परिसरात रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानाच्या आडोशाला मुंबई-कल्याण नावाचा मटका जुगार खेळविला जात असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचूक सापळा रचून छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच जुगारींची एकच पळापळ उडाली. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने सहा जणांना जाग्यावरच पकडले.
या कारवाईत एकूण 1 लाख 82 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये 22 हजार 50 रुपयांची रोख रक्कम, तीन गणकयंत्रे, प्लास्टिकच्या पाट्या, पावती बुक, लाकडी पेपर पॅड, स्टीलची पट्टी, आकडेमोड केलेले कागद, बॉलपेन तसेच विविध कंपनीचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विवो कंपनीचा एक्स 300 अल्ट्रा मॉडेलचा मोबाईल (किंमत 1 लाख 20 हजार रुपये), विवो वाय 28 मॉडेल मोबाईल (10 हजार 500 रुपये), ओपो ए5 प्रो मॉडेल मोबाईल (18 हजार रुपये), एसीई मॉडेल मोबाईल (1 हजार रुपये) तसेच विवो टी4 मॉडेल मोबाईल (10 हजार रुपये) यांचा समावेश आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग अंजना कृष्णा व बार्शी निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे, मपोकॉ नम्रता गटकूळ, चालक पोकॉ भाऊसाहेब महानोर, निर्भया पथक बार्शी उपविभाग यांनी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल साठे करत आहेत. निर्भया पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या निर्णायक कारवाईबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून अवैध धंद्यांविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्याची मागणीही पुढे येत आहे.
