पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा रोजगारासाठी पुढाकार
बेरोजगार युवकांना रोजगाराची नवी दिशा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. महिला व पुरुष दोघांसाठीही ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांची प्रत्यक्ष भरती, विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी तसेच एकाच ठिकाणी मुलाखतीची सुविधा उपलब्ध होणार आहे. युवकांच्या कौशल्यवृद्धीसह त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे समाजाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जातात. पोलीस सेवेत कार्यरत असताना त्यांनी वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती, युवक मार्गदर्शन तसेच व्यसनमुक्ती यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबवले आहेत. समाजाशी नाळ जोडून युवकांना योग्य दिशा मिळावी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशातून त्यांनी या रोजगार मेळाव्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात. अशा युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस पाल्य तसेच जिल्ह्यातील पारधी समाजासह सर्वच तरुण-तरुणींना या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. ज्यांच्या हाताला रोजगार नाही, अशा युवक-युवतींसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जूनअखेर हा मेळावा होणार असून, अधिकाधिक युवक-युवतींनी नावनोंदणी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
मेळाव्यात खासगी कंपन्या, बँका, निमशासकीय संस्था तसेच विविध खासगी क्षेत्रातील नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रोजगार मेळाव्याची तारीख, वेळ व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यासाठी युवक-युवतींनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी आयोजकांनी विशेष बारकोड सुविधा उपलब्ध करून दिली असून, उमेदवारांनी बारकोड स्कॅन करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती भरून ऑनलाइन अर्ज सबमिट करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
