आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाविद्यालयीन तरुण शेअर मार्केटमध्ये तर वाहत जात नाही ना

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 28, 2026
Spread the love

पुणे : शेअर मार्केटमधील तोटा भरून काढून दागिने परत आणून देतो, असे सांगून २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने आपल्या मामाच्या साथीने मित्राकडून तब्बल १८२ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन त्यांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दागिन्यांची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे २७ लाख ३० हजार रुपये आहे.

याप्रकरणी एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी तेजस तानाजी काटकर (वय २०, रा. वडगाव मावळ) आणि त्याच्या मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फेब्रुवारी २०२६ पासून आतापर्यंत घडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तेजस काटकर हे दोघेही आंबेगाव येथील एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. शिक्षणादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली होती. तेजस हा सतत शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये गुंतलेला असायचा. तो फिर्यादीला वारंवार “शेअर मार्केट शिकलास तर मोठा फायदा होतो,” असे सांगत होता. मात्र, फिर्यादी शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असल्याने सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

तेजस फिर्यादीला “शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास शिक्षणाचा खर्च स्वतः भागवता येतो आणि आई-वडिलांनाही आर्थिक मदत करता येते,” असे सांगून त्याला प्रभावित करत होता. त्यामुळे फिर्यादी त्याच्याकडून शेअर मार्केट आणि ट्रेडिंगबाबत माहिती घेऊ लागला.

तेजस काटकर हा फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगत होता. मोबाईलवरील अ‍ॅपद्वारे तो दररोज नफा होत असल्याचे फिर्यादीला दाखवत होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याने फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा तोटा झाल्याचे सांगितले आणि “आणखी थोडी गुंतवणूक केली तर निश्चित फायदा होईल,” असे फिर्यादीला पटवून दिले.

फिर्यादीने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर तेजसने “दागिने मिळाले तर ते गहाण ठेवून पैसे गुंतवतो आणि काही दिवसांत दागिने सोडवून परत देतो,” असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने आपल्या आईकडे ही बाब सांगितली. मुलाच्या मित्राची अडचण दूर व्हावी या हेतूने आईने सोन्याचा राणीहार, नेकलेस आदी मिळून सुमारे ५५ ग्रॅम वजनाचे दागिने मुलाकडे दिले. हे दागिने फिर्यादीने तेजसला तळेगाव दाभाडे येथे नेऊन दिले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तेजसच्या मामाने हे दागिने गहाण ठेवणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर तेजसने आठवडाभरात दागिने परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांनी त्याने पुन्हा शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याचे सांगून आणखी गुंतवणुकीची गरज असल्याचे फिर्यादीला पटवून दिले. “आणखी पैसे गुंतवले तरच नफा होईल आणि आधीचे दागिने सोडवता येतील,” असे सांगून त्याने फिर्यादीकडून पुन्हा सोन्याच्या बांगड्या, कानातील झुमके, पदक आणि पोत असे दागिने घेतले.

दरवेळी “प्रॉफिट झाल्यावर सर्व दागिने परत देतो,” असे आश्वासन तेजस देत होता. मात्र, वारंवार मागणी करूनही त्याने दागिने परत केले नाहीत. अखेर तब्बल १८२ ग्रॅम सोन्याचे दागिने अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादीने पोलिसांकडे दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.