येरवडा कारागृहात गुंडांची हाणामारी
तंबाखू देण्यावरून झाली भांडणे : जेवण वाटपासाठी असलेल्या मापटे डोक्यात घालून केले जखमी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुंडांमध्ये तंबाखूच्या कारणावरून भांडणे झाली. त्यातून दोघा गुंडांनी खुनाच्या आरोपाखाली कोठडीत असलेल्या गुंडावर छोट्या मापट्याने डोक्यात मारून जखमी केले.
शुभम पंढरीनाथ पोखरकर (वय २२, मूळ रा. दिघी) हा या घटनेत जखमी झाला आहे. वरिष्ठ तुरुंगाधिकारी रेवणनाथ कडू कानडे (वय ५७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव (दोघे सध्या रा. येरवडा कारागृह) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक २, बॅरेक क्रमांक ६ मधील बाहेरील बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी पाण्याच्या हौदाजवळ २७ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना बॅरेक क्रमांक ६ मधील सर्कल क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये तंबाखू देण्यावरून भांडणे झाली होती.
२७ मे रोजी शुभम पोखरकर हा शौचालयास जात असताना अजय राठोड याने बंद्यांच्या जेवण वाटपासाठी असलेले छोटे मापटे, ज्याला लाकडी पट्टी होती, ते उचलून “तंबाखूच्या कारणावरून आमच्याशी वाद का घातला,” असे म्हणत शुभम पोखरकर यांच्या डोक्यात मारले.
संतोष भालेराव याने प्लॅस्टिकची बादली त्याच्या डोक्याच्या मध्यभागी व डाव्या बाजूला मारली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करीत आहेत.
तिघेही सराईत गुन्हेगार – या तिघांनाही वेगवेगळ्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांचा जामीन न झाल्याने सध्या त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे. अजय राठोड हा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. संतोष भालेराव याने पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. शुभम पोखरकर व त्याच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता.
