बस प्रवासात तरुणाच्या खिशातील रोकड चोरणारा सराईत चोरटा जाळ्यात
तिघेजण करत होते बस प्रवाशांना लक्ष्य : विश्रांतवाडी पोलिसांनी ३ गुन्हे केले उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्वारगेट ते आळंदी या बसप्रवासात तरुणाच्या खिशातील ३० हजार रुपये चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांनी पकडले. त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने बस प्रवासात केलेल्या चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुनिल सतीश गायकवाड (वय ३३, रा. कामगार मैदान, भाजी मंडईजवळ, मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे साथीदार अनिल तम्मा गायकवाड (वय ३४, रा. सोलापूर) आणि योगेश माने (वय ४०, रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना स्वारगेट ते आळंदी बसप्रवासादरम्यान डेक्कन कॉलेज बस स्टॉप ते होमगार्ड बस स्टॉपच्या दरम्यान २७ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. याबाबत श्रीकांत रंगय्या इगे (वय ३०, रा. सोलापूर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट ते आळंदी बसप्रवासादरम्यान डेक्कन कॉलेज बस स्टॉप ते होमगार्ड बस स्टॉप दरम्यान यापूर्वी ३ ते ४ बस प्रवाशांचे दागिने व खिशातील रोकड चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. विश्रांतवाडी पोलिसांनी या घटनांचा आढावा घेऊन या मार्गावर दुपारच्या वेळी पेट्रोलिंग ठेवले होते. बस स्टॉपवर पोलीस संशयितांचा शोध घेत होते.
फिर्यादी हे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असून सध्या पुण्यात मजुरी करतात. ते बसने जात असताना तिघा चोरट्यांनी नकळत त्यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून ३० हजार रुपये चोरले. होमगार्ड बस स्टॉप येताच ते चोरटे उतरण्याची घाई करू लागले. तेव्हा इगे यांना आपल्या खिशातील रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला.
त्यावेळी बस स्टॉपवर पोलीस थांबले होते. त्यांनी घाईघाईने जाणाऱ्या सुनिल गायकवाड याला पकडले. त्या गडबडीत त्याचे दोन साथीदार पळून गेले. पोलिसांनी सुनिल गायकवाड याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने ३ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
रेकी करून करत होते चोरी
हे चोरटे बाहेरील राज्यातील अंगाने काटकुळे, अशक्त व कमी शिकलेल्या व्यक्तींना लक्ष्य करत होते. त्यांच्याबरोबर बसमध्ये बसून दोघे-तिघे मिळून त्याला घेरत आणि त्याच्या खिशातील तसेच अंगावरील दागिने व रोकड चोरून नेत असल्याचे दिसून आले. डेक्कन कॉलेज बस स्टॉप ते होमगार्ड बस स्टॉपच्या दरम्यान ते उतरून जात असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी दुपारच्या वेळी या मार्गावरील सर्व बस स्टॉपवर पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू केले होते. बसमधून घाईघाईत उतरणाऱ्या सुनिल गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.