आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फुगेवाडीपाठोपाठ पुण्यात विषारी दारूचे ५ बळी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 29, 2026
Spread the love

पुणे : फुगेवाडी येथे विषारी दारू पिल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता त्याच प्रकरणाचे लोण पुणे शहरातही पसरल्याचे समोर आले आहे. हडपसर परिसरातील आणखी ५ जणांचा विषारी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

शहरांमधील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होत असल्याचा दावा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वारंवार केला होता. मात्र, फुगेवाडी आणि हडपसरमधील या मृत्यूंमुळे त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांमध्ये राहुल शरद क्षीरसागर (वय ४५, रा. पांढरे मळा, हडपसर), विजय भुकुरलाल शर्मा (वय ४५, रा. ससाणेनगर, हडपसर), अरुण डाडर (रा. हडपसर), अशोक रमेश चव्हाण (रा. काळेपडळ) यांचा समावेश आहे. आणखी एका मृत व्यक्तीची ओळख निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

फुगेवाडी आणि हडपसर परिसरात योगेश वानखेडे याने ही विषारी दारू पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना उघडकीस आल्यानंतर योगेश वानखेडे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात हजर झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही त्याच्यावर हातभट्टीच्या दारूच्या पुरवठ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

फुगेवाडी येथे गुरुवारी सकाळपासून दारू पिलेल्या व्यक्तींचे एकामागोमाग एक मृत्यू होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दारू सेवन केलेल्या अनेकांना अचानक चक्कर येणे, उलट्या होणे आणि प्रकृती खालावणे अशा तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्रीपर्यंत फुगेवाडी परिसरातील १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

फुगेवाडीप्रमाणेच हडपसर परिसरातही एकाच ठिकाणाहून दारू सेवन केलेल्या व्यक्तींना त्रास होऊ लागला. त्यातील एका व्यक्तीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. त्यानंतर उपचार सुरू असलेल्या आणखी चार जणांनी पहाटेपर्यंत प्राण गमावले.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुरुवारी सायंकाळी विषारी दारू सेवनामुळे काही नागरिकांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सर्वांनी हडपसरमधील मंत्री मार्केट परिसरातून दारू खरेदी करून सेवन केली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपास सुरू असून, दारूचा स्रोत आणि पुरवठा साखळी शोधण्याचे काम सुरू आहे.

“विषारी दारू सेवनामुळे हडपसर परिसरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” – मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त