जनगणनेसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग : मुलालाही मारहाण
जनगणना कामात अडथळा, दगडाने हल्ला : ५ जणांसह अन्य साथीदारांवर गुन्हा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत जनगणना करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच संबंधित महिलेच्या मुलालाही हाताने व दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांसह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विकास नवनाथ मोरे, क्रांती विकास मोरे (वय ३६), मुक्ता राजाभाऊ कसबे (वय ४३), लिलावती नवनाथ मोरे (वय ६५) आणि अभिजित श्रीधर मोरे (वय २६, सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या आणखी पाच साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ आणि २८ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला जनगणना कामासाठी नियुक्त असून त्या २७ मे रोजी दुपारी ३ वाजता मिनाताई ठाकरे वसाहतीतील ब्लॉक क्रमांक २१६, गल्ली क्रमांक १४ येथे विकास मोरे यांच्या घरी जनगणनेची माहिती नोंदविण्यासाठी गेल्या होत्या.
त्यांनी घर व कुटुंबप्रमुखाची माहिती नोंदवून घेतली. मात्र, मोरे यांचे त्याच वसाहतीत आणखी एक घर असल्याने त्याचीही नोंद करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित घराची नोंद यापूर्वीच झाल्याचे महिलेने सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या मोरे यांनी शिवीगाळ करून जनगणनेच्या कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे महिला त्या दिवशी परत गेल्या.
त्यानंतर जनगणनेच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी त्या २८ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पुन्हा त्या परिसरात गेल्या. यावेळी मागील दिवसाच्या वादाचा राग मनात धरून विकास मोरे, त्याची पत्नी क्रांती मोरे, बहिण मुक्ता कसबे, आई लिलावती मोरे आणि पुतण्या अभिजित मोरे यांनी महिलेला शिवीगाळ करत धमकावले.
त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या इतर पाच महिला व पुरुषांनी अचानक येऊन फिर्यादी महिला आणि तिच्या मुलाला हाताने तसेच दगडाने मारहाण केली. त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
यावेळी विकास मोरे याने महिलेचा हात पकडून तिच्या ब्लाऊजची डावी बाही फाडत लज्जास्पद वर्तन केले. तसेच तिचा मोबाईल फोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील माळ हिसकावण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, धमकी देणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट पुढील तपास करीत आहेत.
