आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिक्षाचालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 29, 2026
Spread the love

पुणे ; विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याने रिक्षाचालक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घोरपडी पेठेत घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका विवाहित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गणेश अशोक हलवाई (वय २४, रा. घोरपडी पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची बहीण कोमल निलेश सोनवणे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नाली संतोष तावरे (वय ३२, रा. गोरेगाव, महाड, रायगड) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ मे रोजी पहाटे घोरपडी पेठेतील राहत्या घरी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हलवाई हा रिक्षाचालक असून तो आई-वडिलांसोबत राहत होता. त्यांच्या शेजारी स्वप्नाली तावरे यांच्या घरी तुळजापूरच्या देवीचे देवस्थान आहे. घरातील धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गणेश तेथे दर्शनासाठी जात असे. त्यातून त्याची स्वप्नाली हिच्याशी ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

या संबंधांची माहिती नातेवाईकांना समजल्यानंतर स्वप्नाली आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर स्वप्नाली घर सोडून महाड येथे गेली होती. तिला सोडण्यासाठी गणेश तिच्यासोबत गेला होता. दोन दिवसांनंतर तो परत आल्यानंतर घोरपडी पेठेतील नातेवाईक आणि स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी हा वाद मिटवून दोघांनी यापुढे एकमेकांशी संपर्क ठेवू नये, असा निर्णय घेतला होता.

मात्र, त्यानंतरही गणेश आणि स्वप्नाली यांच्यात अधूनमधून फोनवर संभाषण सुरू होते. याबाबत गणेशच्या बहिणीने त्याला समज दिली असता, “मी तिला फोन करत नाही. तिचाच फोन येतो. फोन बंद केला तर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची किंवा स्वतः जीव देण्याची धमकी ती देते. त्यामुळे मला सतत मानसिक त्रास होत आहे,” असे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

१ मे रोजी रात्री गणेश हा स्वप्नालीशी उशिरापर्यंत फोनवर बोलत होता. त्यावेळी तो मानसिक तणावाखाली असल्याप्रमाणे वारंवार घराबाहेर आणि घरात ये-जा करत होता. रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागली नव्हती.

दुसऱ्या दिवशी, २ मे रोजी सकाळी सुमारे ७ वाजता त्याची आई मीना हलवाई घर उघडण्यासाठी गेली असता, गणेशने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील चौकशी आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताळीकोटे करीत आहेत.