दारूच्या वासाच्या जागी दरवळणार सुगंधी अगरबत्तीचा सुगंध
दारू गाळणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांचे आश्वासक पाऊल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हातभट्टीची विषारी दारू पिल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात अनेकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर, पिढ्यानपिढ्या दारू गाळण्याचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना गृहउद्योगाच्या माध्यमातून पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांनी एक आश्वासक पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने आयोजित महिला मेळाव्यात अगरबत्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
येरवडा परिसरात ब्रिटिशकालीन दारू गाळण्याचे, तयार करण्याचे व विक्री करण्याचे अवैध धंदे पिढ्यानपिढ्या सुरू होते. सुमारे चार महिन्यांपूर्वी लक्ष्मीनगर हे नवीन पोलीस ठाणे स्थापन झाले. आतापर्यंत या परिसरातील ५० ते ५५ गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलिसांनी पूर्णतः उद्ध्वस्त केल्या आहेत. या दारूभट्ट्या प्रामुख्याने महिला चालवत होत्या. दारूभट्ट्या बंद झाल्याने या महिलांची आर्थिक कुचंबणा सुरू झाली होती. या महिलांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लक्ष्मीनगर पोलिसांनी सुरू केला.
सितारा महिला विकास संस्था या महिला गृहउद्योग संस्थेच्या अधिकारी आणि भूमाता ब्रिगेडच्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी पोलिसांच्या या योजनेचे स्वागत केले. पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी शुक्रवारी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याला उपस्थित महिलांना उदबत्ती बनविणे, चपाती बनविणे आणि कापूर तयार करणे याबाबत प्रशिक्षण व माहिती देण्यात आली. प्रत्येक महिलेला दिवसाकाठी ४०० ते ५०० रुपयांपर्यंत रोजगार मिळू शकतो. तयार केलेल्या वस्तू बचत गट स्वतः घेऊन जाणार आहे. या गृहउद्योगामुळे लक्ष्मीनगर भागातील महिला व वृद्धांना प्रशिक्षणासह उद्योगाचा चांगला फायदा होणार आहे. या महिलांना अवैध धंद्यापासून परावृत्त करण्यासाठी हा गृहउद्योग उपयुक्त ठरणार आहे. या मेळाव्याला जवळपास २०० महिला उपस्थित होत्या. मेळाव्याला लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम आणि पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी मार्गदर्शन केले.
लक्ष्मीनगर, लमाण वस्ती येथे पिढ्यानपिढ्या बेकायदेशीर दारू गाळण्याचा व्यवसाय अनेकजण करतात. त्यांचे शिक्षण कमी असून अन्य कोणतेही रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे ते पुन्हा-पुन्हा हातभट्टीची दारू बनविण्याचे काम करतात. त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्या महिला या व्यवसायाकडे वळणार नाहीत. जेथे दारूचा वास येत होता, तेथे सुगंधी उदबत्तीचा सुगंध दरवळावा, असा आमचा प्रयत्न आहे. — रवींद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटामार्फत विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. या महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना दारू गाळण्याच्या बेकायदेशीर व्यवसायापासून कायमचे दूर करण्याच्या लक्ष्मीनगर पोलिसांच्या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. — तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या