आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विषारी दारू प्रकरणात हडपसरचे ३ पोलीस अधिकारी निलंबित

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 30, 2026
Spread the love

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारू पिऊन १९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत हातभट्टी दारूची विक्री झालेल्या हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तिघांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलीस ठाण्यातील ६ पोलीस अधिकारी व अंमलदारांना निलंबित केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि ४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

हडपसर व फुगेवाडी परिसरात विषारी दारूची विक्री झाल्याने हडपसर आणि फुगेवाडी परिसरातील १९ जणांचा मृत्यू झाला. अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

ही घटना पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व पर्यवेक्षणाच्या अभावामुळे घडल्याचे मानले जात आहे. या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षक हसिना सिकलगार आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर तसेच पोलीस अंमलदार विशाल काळे, जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे आणि सागर जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कोर्ट कंपनीचे पोलीस निरीक्षक अशोक व्यंकटराव इप्पर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.