इंडिगोच्या गुवाहाटी विमानात ‘BOMB’ लिहिलेली चिठ्ठी सापडली
पुणे विमानतळावरील घटना : खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुण्याहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या प्रसाधनगृहात ‘BOMB’ (बॉम्ब) असे लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर संपूर्ण विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इंडिगो एअरलाइन्सचे सहायक सुरक्षा प्रमुख विशालकुमार श्रीवास्तव (वय ३०, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे पुणे-गुवाहाटी हे विमान २९ मे रोजी सकाळी ७ वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणार होते. विमानात प्रवासी बसलेले असतानाच विमानातील एअर होस्टेस ईफत खान यांना प्रसाधनगृहात पांढऱ्या कागदाच्या तुकड्यावर ‘BOMB’ असे लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यांनी तात्काळ ही बाब लीड केबिन क्रूच्या निदर्शनास आणून दिली.
या घटनेची माहिती सुरक्षा विभागाला पहाटे ६.४४ वाजता मिळाल्यानंतर तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून विमान आयसोलेशन क्षेत्रात हलविण्यात आले. सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), एअरलाइन्सचे अभियांत्रिकी विभाग आणि सुरक्षा पथकाने विमानाची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.
विमानाच्या आत तसेच प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने संबंधित चिठ्ठी कोणी ठेवली किंवा लिहिली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कागदाच्या तुकड्यावर ‘BOMB’ असा धमकीचा संदेश लिहून प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे तसेच भीतीचे वातावरण पसरवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड करीत आहेत.
