व्यवसायासाठी पर्सनल लोन काढायला सांगून तरुणीची फसवणूक
पैसे मागितल्यावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी : जळगावच्या तरुणावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिअर शॉपीचा व्यवसाय करण्यासाठी प्रियकराने तरुणीला १८ लाखांचे वैयक्तिक कर्ज काढायला लावले. त्यानंतर तिने पैसे परत मागितल्यावर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत केशवनगरमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोहित अतुल पाटील (वय ३१, रा. श्रीरामनगर, चोपडा, जि. जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जून २०१६ पासून सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मूळची जळगावची रहिवासी असून, जून २०१६ मध्ये जळगावमधील एम. आर. कॉलेजमध्ये बीबीएमचे शिक्षण घेत असताना तिची रोहित पाटील याच्याशी ओळख झाली.
त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंधही आले. पुढील शिक्षणासाठी ही तरुणी पुण्यात आली.
त्यानंतर रोहित तिच्यावर दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय घेऊन वेळोवेळी मारहाण करत असे. त्यामुळे २०२२ मध्ये दोघे वेगळे झाले.
रोहित गावी निघून गेला. तरुणी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बँकेत नोकरीला लागली. तिचे २०२३ मध्ये लग्न झाले. दरम्यान, रोहित हा तरुणीला वारंवार फोन करून पैसे मागत असे.
पैसे दिले नाहीत तर त्यांच्यासोबतचे फोटो तिच्या पतीला पाठवण्याची धमकी देत असे. काही वर्षांनंतर पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्याने त्यांचा घटस्फोट झाला.
फेब्रुवारी २०२५ मध्ये रोहित पुन्हा केशवनगर येथे तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी आला. त्याने बिअर शॉपीचा व्यवसाय सुरू करायचा असल्याचे सांगून तिला कर्ज काढण्यास सांगितले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिने दोन बँकांतून १८ लाख रुपयांचे कर्ज काढले. या कर्जाचे हप्ते रोहित भरणार होता. जुलै ते नोव्हेंबर २०२५ पर्यंतचे हप्ते त्याने भरले. त्यानंतर त्याने, “माझ्याकडे पैसे नाहीत.
मी पैसे देऊ शकत नाही. तुला जे करायचे ते कर,” असे सांगितले. पुन्हा पैसे मागितल्यास मारून टाकण्याची धमकी देत, “तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करीन,” असे सांगून तो मूळ गावी जळगावला निघून गेला.
तिने वेळोवेळी कर्जाचे हप्ते भरण्याबाबत फोन केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने फोन उचलणेही बंद केले. अखेर या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक कवीराज पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
