आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन बालिकेचा बालविवाह रोखला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 1, 2026
Spread the love

बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून हा बालविवाह रोखला. वेळेवर केलेल्या या हस्तक्षेपामुळे बालिकेचे संरक्षण करण्यात यश आले.

सकाळी सुमारे १० वाजता बालविवाहाबाबतची माहिती विशेष बाल पोलीस पथकाचे प्रमुख तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना व्हॉट्सॲपद्वारे माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच संकेत देवळेकर यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीच्या सूचना देत बालिकेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनीही तत्काळ यंत्रणा सक्रिय करून कारवाईसाठी पथक रवाना केले. माहिती प्राप्त झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोहेकॉ अमोल माने, पोकॉ सचिन राऊत, महिला पोलीस कॉन्स्टेबल उशा माने तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता दाखवत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पथकाने वेळेत हस्तक्षेप करून बालविवाह रोखत अल्पवयीन बालिकेची सुटका केली. बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी आणि एका अल्पवयीन बालिकेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या संवेदनशील आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

विशेष बाल पोलीस पथकाचे प्रमुख तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोहेकॉ अमोल माने, पोकॉ सचिन देशमुख , पोकॉ सचिन राऊत, पोकॉ अविनाश पवार, मपोकॉ उशा माने, पोकॉ. रामेश्वर मस्के तसेच कारवाईत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बाल कल्याण समितीच्या सदस्यांनीही या कारवाईचे स्वागत करत, बालकांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.